आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांनी वाढवला जि. प. निवडणुकीतील मतदानाचा टक्का!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मतदार जनजागृती, नवी नोंदणी, सोशल मीडिया याबरोबरच जिल्ह्यात तीन लाख ऊसतोड कामगार गावी परतल्याने मागील वेळीपेक्षा बीड जिल्ह्यात यंदा मतदानाचा टक्का पावणेचारने वाढला आहे. जिल्हा परिषदेला २०१२ मध्ये ६६.९० टक्के मतदान झाले होते; मात्र आता हीच टक्केवारी ७०.३४वर पोहोचली आहे.  

पाच वर्षांपूर्वी ७ फेब्रुवारी २०१२ मध्ये जिल्हा परिषद  व पंचायत समितीच्या  निवडणुकीत जिल्ह्यातील ५९ गटांत  एकूण  १४ लाख ३९ हजार ६२ मतदारांपैकी  नऊ लाख ६२ हजार ७७० मतदारांनी हक्क बजावला होता.  गेवराई तालुक्यात  ७२. २९ टक्के  म्हणजे सर्वाधिक मतदान झाले होते. या तालुक्याच्या खालोखाल बीड तालुक्यात ६८.९१ टक्के मतदान झाले होते, तर सर्वात कमी मतदान वडवणी तालुक्यात झाले होते. हे प्रमाण ६१.६३ एवढे मतदान झाले होते. जिल्ह्यात एकूण ६६.९० टक्के मतदान जिल्ह्यात झाले होते. 
 
पुढे दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात  पाटोदा,आष्टी, वडवणी, शिरूर येथे नगरपंचायती अस्तित्वात आल्याने  पुनर्ररचनेेमुळे चार जिल्हा परिषद  गटांचा नगर पंचायतीत समावेश झाला. या  चार नगर पंचायती वगळून मागील पाच वर्षांत  जिल्ह्यात ६२ हजार ४८९ इतके मतदार वाढले आहेत.  
त्याचबरोबर जिल्ह्यात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, मतदार जनजागृती, नवीन नोंदणी या कारणामुळे मतदार वाढत गेले. यंदा कमी उसामुळे राज्यातील काही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम १० फेब्रुवारीपूर्वीच संपल्याने बीड जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले जवळपास  ३ लाख ऊसतोड  कामगार  गावी परतले. त्यांनी निवडणुकीत मतदान केल्याने यंदा  मतदानाचा टक्का जवळपास पावणेचार टक्क्यांनी वाढला आहे. मतदानाअाधीच कामगार गावी आल्याने यंदा  विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांना साखर कारखान्याच्या फडातून  कामगारांना गावी मतदानाला आणण्याचा खर्चही वाचला आहे.  
 
१० लाख ७८ मतदारांनी बजावला हक्क   
जिल्हा परिषदेचे एकूण ६० गट असून १२० पंचायत समिती गण आहेत. 

१८६६ मतदान केंद्रावर स्त्री व पुरुष मिळून  एकूण १५ लाख ३२ हजार ७४२ मतदारांपैकी १० लाख ७८ हजार २४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५ लाख ८२ हजार ४२१ पुरुष, तर ४ लाख ९५ हजार ८२७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांनी मतदान केले आहे.  
 
वडवणीत ९.९५ % मतदान वाढले   
मागील पाच  वर्षांपूर्वी जिल्ह्यात कमी मतदान असणाऱ्या  वडवणी तालुक्यात यंदा ९.४५ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. पाच वर्षांपूर्वी वडवणीत केवळ ६१.६३ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाची टक्केवारी ७१.३१ वर गेली. दुसऱ्या क्रमांकावर शिरूर तालुका राहिला. पाच वर्षांपूर्वी ६३.२३ टक्के मतदान असलेल्या या तालुक्यात यंदा ६८.६२ टक्के मतदान झाले. यंदा सर्वाधिक कमी  मतदान धारूर तालुक्यात झाले असून तेथे ६५.८५ टक्के नोंद झाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...