आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघमारे, वानखेडे यांचे अर्ज बाद; १ ऑक्टोबरनंतर लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांतून नामनिर्देशन भरलेल्या उमेदवारांच्या अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. लातूर शहरमधून राष्ट्रवादीचे डॉ. जे. एम. वाघमारे तर शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा नांदेड उत्तर मतदारसंघातून अर्ज बाद झाला. उमेदवारी मागे घेण्याची तारीख १ ऑक्टोबर असून त्यानंतर लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
परभणी - चार विधानसभा मतदारसंघांतील १० उमेदवारांचे अर्ज बाद झाले. बाद अर्जांमध्ये पाथरीत गौतम ब्रह्मराक्षे (अपक्ष), गंगाखेडात बालाजी मुंडे (मनसे), कालिदास कुलकर्णी (शिवसेना), सुभाष कदम (भाजप), डॉ.बालासाहेब जोंधळे (अपक्ष), विठ्ठ्ल साखरे (बहुजन मुक्ती पार्टी) यांचा समावेश आहे. परभणीत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ (राष्ट्रवादी काँग्रेस), समाधान पोटभरे (बसपा), जिंतुरात कपिल खिल्लारे (बसपा) व जितेंद्र घुगे (भाजप) यांचे अर्ज बाद झाले.
नांदेड - नऊ विधानसभा मतदारसंघांत ४५० पैकी ५१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. नांदेड उत्तर मतदारसंघातून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा अर्ज अवैध ठरला. छाननीनंतर ३९९ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जासोबत एबी फॉर्म नव्हता. त्यांचा अर्ज बाद ठरला. वानखेडे यांनी दुपारी सेनेकडून अर्ज दाखल केला. सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश केला.
हिंगोली- तीन विधानसभा मतदारसंघांतील ८ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. त्यामध्ये ७ जणांचे अर्ज पक्षाचा ‘बी’ फॉर्म जोडला नसल्याने रद्द झाले असून आता रिंगणामध्ये ८३ उमेदवार राहिले आहेत. हिंगोली विधानसभेत भारतीय नवजवान सेनेचे खिल्लारी देवराव शामराव, मनोज बाबुलाल जैन, प्रभाकर दामाजी भाकरे आणि राजेश किसन भाेसले (तिघेही भाजपचे) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या सर्व नामांकनपत्रांना पक्षाचे ‘बी’ फॉर्म जोडले नव्हते. कळमनुरी विधानसभेत राष्ट्रवादीचे नागोराव करंडे यांना पक्षाचे तिकीट नसल्याने, तर सूचक व अनुमोदकांची नावे नसल्याने अपक्ष अमृतराव बोथीकर यांचा अर्ज रद्द झाला. वसमत येथे किसान काँग्रेस पक्षाचे डॉ. भगत चामले आणि काँग्रेसचे प्रशांत गायकवाड यांनाही तिकीट
नसल्याने उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत.
उस्मानाबाद - चार मतदारसंघांतील एकूण १५ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. सध्या १०९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
१५७ मैदानात
लातूर - सहा मतदारसंघांतून ३२ उमेदवार बाद झाले, तर १५७ मैदानात आहेत. औसातून सर्व २१ उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. निलंगातून सात जणांची उमेदवारी रद्द झाल्याने १९ जण मैदानात आहेत. येथून माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्यासह सात जणांचे अर्ज बाद झाले. पाटील यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडला नव्हता. परंतु रूपाताईंचे चिरंजीव संभाजी पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्याने ते मैदानात आहेत. लातूर शहर मतदारसंघातून ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले यात राष्ट्रवादीचे डॉ. जे. एम. वाघमारे यांचा समावेश आहे.
जालना - पाच विधानसभा मतदारसंघांतील ४१ अर्ज बाद ठरले आहेत. जालना विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक १७ अर्ज बाद झाले आहेत, तर बदनापूर
येथून ११ अर्ज बाद झाले.
बीड - सहा विधानसभा निवडणुकीत २४८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात ४१ जणांचे अर्ज अवैध ठरले असून २०७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.