आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने ताण दिल्याने जिल्हा तहानलेलाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सलग दोन वर्षे पावसाने लहरीपणा दाखवला. यंदा तरी चांगला पाऊस होईल, अशी आशा होती. परंतु रोहिणी आणि हमखास पावसाचे मृग नक्षत्रही कोरडे चालल्याने जिल्ह्यात जनता सैरभैर झाली आहे. भरपावसाळ्यात 151 टंचाईग्रस्त गावांमध्ये सध्या 174 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाने आणखी ताण दिला, तर पाणीटंचाईचे दुर्भिक्ष ठळकपणे जाणवण्याची स्थिती आहे.

दोन वर्षांपूर्वी दुष्काळाचे चटके सोसलेल्या जिल्ह्यात या वर्षी सुरुवातीलाच पावसाच्या हुलकावणीमुळे जिल्ह्यातील शेती व्यवसायासह बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. या वर्षीही जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, गेवराई या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाल्याने या तालुक्यांमध्ये टँकरची संख्या जास्त प्रमाणात आहे. सात जूनला पावसास प्रारंभ होईल, असा अंदाज शेतकर्‍यांकडून वर्तवला जात होता, त्यानुसार पाऊसही झाला. मात्र, नंतरच्या टप्प्यात पावसाने दडी मारली. त्यात रोहिणी, मृगाचे नक्षत्रही कोरडे गेले. परिणामी, खरिपाच्या पेरण्याही लांबणीवर गेल्या. पेरणीयोग्य पाऊस झाला, तरच शेतकर्‍यांनी पेरण्या कराव्यात. पेरणीसाठी आठ दिवसांमध्ये सरासरी 80 मि.मी. पावसाची आवश्यकता असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. जे शेतकरी कमी पाऊस असताना खरिपाच्या पेरण्या करतील, त्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावेल, असा इशाराही कृषी अधिकार्‍यांनी दिला आहे.
141 तलावांमध्ये 7 टक्के पाणी
जिल्ह्यात गोदावरी आणि कृष्णा खोर्‍यांर्तगत मोठे, मध्यम, लघु अशी एकूण 141 तलवांची संख्या आहे. सर्वांमध्ये 883.15 दलघमी उपयुक्त पाणीसाठा असतो. त्यापैकी सध्या केवळ 7.65 टक्केत्वरित उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, तलावांमधील पाणीपातळी कमी झाल्याने टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे अधिकार्‍यांमधून सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात रोहिण्यांपाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे जाऊ लागल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडतात की काय, अशी धास्ती आता शेतकर्‍यांना लागली आहे.
जिल्ह्यातील बिंदुसरा, माजलगाव, वाण, मांजरा या मोठ्या प्रकल्पांत अजूनही पाणीपातळी वाढलेली नाही. मोठा पाऊस झाला, तर पातळी वाढण्याची शक्यता आहे.