आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्न सुरक्षा धोक्यात : दुकानदारांच्या माथी सडलेला गहू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - गरीबांना सवलतीत अन्नधान्य वाटप करण्यासाठी चक्क सडलेले गहू नुतन वसाहत येथील गोदामात आणण्यात आले. मात्र, गहू घेऊन जाण्यास दुकानदारांनी नकार दिल्यामुळे पुरवठा विभागाची त्रेधातिरपीट उडाली. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यावर पुरवठा विभागाने कार्यवाहीचे पुढील सोपस्कार केले. दरम्यान, खराब गहू परत पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्नधान्याची वाहतूक अशी
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून अन्नधान्याची शासनाकडे मागणी केली जाते. यानुसार फुड कार्पोरेशन ऑफ इंडीया अन्नधान्याचा पुरवठा करते. सर्वप्रथम हे अन्नधान्य मनमाड येथील गोदामात व त्यानंतर रेल्वेमार्गे जालन्यात येते. भोकरदन नाका व जालना तालुक्यातील बोरखेडी असे दोन फुड कार्पोरेशन ऑफ इंडीयाचे गोदाम आहेत. रेल्वे स्थानकावरून उतरवलेले अन्नधान्य प्रथम या गोदामात साठवले. त्यानंतर संबंधित तालुक्यांच्या गोदामात व तेथून स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा होतो.

400 क्विंटल गहू सडलेला
जालना शहरात अंबड रोडवर नुतनवसाहत भागात अन्नधान्याचे शासकीय गोदाम आहे. येथून जालना तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना अन्नधान्याचा पुरवठा होतो. दरम्यान, चालु महिन्याचे धान्य वाटपाचे काम एक तारखेपासून सुरू झाले होते. 1-4 जुलै या चार दिवसात या गोदामात 2300 क्विंटल गहू बोरखेडी येथील गोदामातून आणण्यात आला. याचे वितरणही स्वस्त धान्य दुकानदारांना सुरू झाले. मात्र, शुक्रवारी चक्क सडलेला गहू आढळून आल्यामुळे दुकानदारांनी धान्य स्विकारण्यास नकार दिला. चार दिवसात 4-5 गाड्यांमधून तब्बल 400 क्विंटल गहू सडलेला आल्याचे सुत्रांनी सांगितले.

वाहनात धान्य भरतेवेळी दुर्लक्ष
प्रत्यक्षात बोरखेडी येथील गोदामातून धान्य वाहनात भरताना तपासणी करूनच भरावे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले. गुरुवारी सडलेले गहू गाडीत भरून जालन्यातील गोदामात उतरविण्यात आले. मात्र, धान्य दुकानदारांना वितरीत करण्याचे काम सुरू झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. बोरखेडी येथील गोदामातून धान्य भरण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी पुरवठा विभागाचे दोन कर्मचारी असतात. तरीही सडलेले धान्य वाहनात भरले, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच नुतन वसाहत येथील गोदामातही एक शासकीय कर्मचारी आहे. तरी सुद्धा सडलेले गहू स्वस्त धान्य दुकानदारांच्या माथी मारले जात होते.

योजना धोक्यात
देशत 80 % लोकांना सवलतीत धान्य पुरवठा करण्यासाठी 3 जुलै 2013 रोजी अन्नसुरक्षा विधेयक लागू करण्यात आले. मात्र, अन्नधान्याची काळ्या बाजारात विक्री असेल किंवा चढ्या दराने विक्री. तसेच अन्नधान्याच्या गुणवत्तेचा विषय नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. परिणामी हेतूलाच तडा गेला आहे.

सडलेला गहू नको
- स्वस्त धान्य दुकानातून लोकांना चांगले धान्य मिळायला हवे. मात्र, गोदामातून खराब, किडलेले गहू दिले जावू लागले. यामुळे आम्ही धान्य घेण्यास नकार दिला. चांगल्या प्रतिचे धान्य वाटप करावे. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली जाईल.'' विश्वनाथ ढवळे, तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, जालना

नमुने मागवले
- शासकीय गोदामात आलेल्या गव्हाचे नमुने मागवले आहे. मात्र, खराब गव्हाबाबत कुठलीच माहिती आपल्याकडे आली नाही. तरी गोदामातून गव्हाचे नमुने मागवले आहेत. याबाबतचा अहवाल मागवून पुढील कार्यवाही करू.'' अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना