आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष्णुपुरी जलाशयावर ‘वॉच’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयात पिण्यासाठी पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याने महापालिका, महसूल प्रशासन, महावितरण, पोलिस आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त पथकाकडून दोन बोटीच्या साहाय्याने जलाशयाच्या पात्रात पावसाळा सुरू होईपर्यंत दररोज गस्त घातली जाणार आहे. या मोहिमेचा पहिला भाग म्हणून पथकाने जलाशयाच्या काठावर असलेल्या शेतक-या शी संपर्क करून शेतीसाठी वापरण्यात येणा-यामोटारी काढून घ्याव्यात अन्यथा जप्त करून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार व आयुक्त जी.श्रीकांत यांनी केले आहे. शेतक-या साठी पाण्याचा उपसा 1 जानेवारीपासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पाणी वाटप समितीने घेतला असून, त्यानुसार महावितरण कंपनीने नदीकाठावरील कृषिपंपाचा विद्युत पुरवठा बंद केला आहे; परंतु काही शेतकरी जनरेटर अथवा वीज पुरवठ्याच्या पर्यायी साधनाचा वापर करून मोटारीद्वारे शेतीला पाणीपुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी गस्त घालण्यासाठी दक्षता पथक स्थापन केले. पथकात नायब तहसीलदार आर.जी.गळगे, मनपा सहायक आयुक्त शिवाजी डहाळे, उपअभियंता यशवंत
निखाते, महावितरणचे प्रमोद क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक एस.एन.गुडे यांचा समावेश आहे.