आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहापूर मजरा गाव बारमाही टँकरवर, सर्वच हातपंप बंद, तीव्र टंचाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - तीन वर्षांपासून कमी होत असलेला पाऊस, मृत साठ्यात असलेला माजलगाव प्रकल्प यामुळे प्रकल्पावरील शहापूर मजरा गाव तीन वर्षांपासून पाणीटंचाईच्या संकटात सापडले आहे. मागील वर्षापासून तर गावाला बारा महिन्यांपासून रोज टँकरने पाणी पुरवले जात अाहे. दुष्काळामुळे गावातील पाणीपुरवठ्याची विहीर कोरडी, तर हातपंप बंद पडले आहेत.
तीन वर्षांपासून कमी पावसामुळे माजलगाव प्रकल्प मृत साठ्याच्या खाली आहे. ७०० फूट खोलवर विंधन विहीर घेऊनही पाण्याचा थेंबही लागत नाही. सध्या माजलगाव तालुक्यात ४९ गावांना ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी ९१ ठिकाणी विहिरी व बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शहापूरे मजरा या गावास तीन वर्षांपूर्वी फक्त भर उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. आता गावास बाराही महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. गावापासून सहा किलोमीटर अंतरावर एका शेतकऱ्याची विहीर अधिग्रहित करण्यात आली असून यावरून टँकरने पाणी पुरवले जात आहे. गावची लोकसंख्या ७५० असून गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. गावात दिवसातून केवळ एक वेळेस टँकर येते, तेही अवेळी. त्यामुळे टँकरवर पाणी मिळवण्यासाठी झुंबड उडते. गर्दीमुळे अनेकांना पाणी न मिळताच परत घरी जावे लागते. शेतात ज्या ठिकाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी गुरे नेऊन त्यांना पाणी पाजावे लागत आहे. शहापूर मजरा गावात सध्या ५ हातपंप असून त्यातील एकाही हातपंपाला पाणी नाही. गावात २०११-१२ मध्ये भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली; परंतु पाणीपुरवठ्यासाठी स्रोत असलेली विहीरच कोरडी पडली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च केलेली पाणीपुरवठा योजनाही नावाला राहिली. ऊसतोड कामगार कारखान्याहून परतल्याने पाणीटंचाईत आणखी भर पडली. गावातील इंद्रवणी आळणे म्हणाल्या, गावात कोणत्याही वेळी टँकर येत असल्याने पाणी भरण्यासाठी धांदल उडत असून सध्या टँकर एकच खेप टाकत आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही.
मनुरवाडीत पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट
माजलगाव शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मनुरवाडी या गावालादेखील १२ ही महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे येथील परिस्थिती वेगळी नसून गावापासून दोन मैलांवर जाऊन पाणी आणावे लागत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, जाफराबाद तालुक्याला ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा.... जिवावर उठला दुष्काळ, गेवराईमध्ये चौथा बळी