आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौदा बंधाऱ्यांच्या अडथळ्यातून नागमठाणमध्ये पाणी दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- नाशिक जिल्ह्यातील दारणा समूह व इतर लहानमोठ्या नद्यांद्वारे नांमकात जमा झालेले पाणी दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदी व डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव, राहातासाठी सोडण्यात आले होते. चौदा बंधाऱ्यांचा अडथळा पार करीत हे पाणी वैजापूर तालुक्यातील नागमठाण वेअरमध्ये मध्यरात्री दाखल झाले. नागमठाण येथील वेअरमध्ये असलेल्या पाणी मोजण्याच्या यंत्राद्वारे सकाळी करण्यात आलेल्या नोंदीनुसार ११ हजार ५०० क्युसेक वेगाने हे पाणी जायकवाडीकडे झेपावते केले असून आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी झाल्याने पुढील काही तासांत जायकवाडीत जाणाऱ्या पाण्याची गती कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर पीकअप वेअर कालव्यातून पाणी गंगापूर तालुक्यातील (कायगाव) जायकवाडी बॅक वॉटरमध्ये मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पोहोचले आहे. या आलेल्या पाण्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत असून ठिकठिकाणी जलपूजन करण्यात येत आहे. सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील गोदाकाठच्या परिसरात नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. त्यामुळे आज आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील नेवरगाव, कानडगाव, कायगाव आदी ठिकाणच्या नागरिकांनी ठिकठिकाणी या पाण्याचे जलपूजन करून आणखी पाणी येऊ देण्यासाठी वरुणदेवाला साकडे घातले. कायगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाखाली पाण्याचे जलपूजन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
नांमकातून गंगापूरसाठी पाणी सोडा
नांमकातून गोदावरीसोबतच नगर जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी पिण्याच्या नावाखाली पाटबंधारे प्रशासनाला मॅनेज करून कोपरगाव, राहाता व इतर ठिकाणी डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यास भाग पाडले असून तेथील विहिरी, लहान मोठे बंधारे भरून घेण्यास प्रारंभ करून मराठवाड्याच्या पाण्यावर दरोडा घालण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याच न्यायाने पाणी द्यावयाचे असेल, तर सलग तीन वर्षांपासून गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या गंगापूरलादेखील पाणी द्यावे, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
बातम्या आणखी आहेत...