आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Issue At Latur Municipal Corporation, News In Marathi

लातुरमध्ये पाणी पेटले: अनोखा निषेध; टेबलांना जलाभिषेक!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरमधील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सगळे विषय बाजूला ठेवून पाण्याच्या विषयावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेच्या सभेत प्रचंड गोंधळ झाला. हमरीतुमरीवर आलेल्या नगरसेवकांनी एकमेकांवर हात उगारले, तर राष्ट्रवादीच्या महिला नगरसेवकांनी आणलेल्या बाटल्यांतील पाणी महापौर-आयुक्तांच्या टेबलावर ओतले. राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी टेबलावर बैठक मारली. त्यामुळे सर्व विषय मंजूर, असे सांगत महापौरांनी सभाच गुंडाळली.
लातूर महापालिकेने शुक्रवारी सर्वसाधारणसभा बोलावली होती. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तीव्र पाणीटंचाईवर चर्चा करण्याची मागणी केली. प्रभारी महापौर सुरेश पवार यांनी अजेंड्यावरील विषयावरच चर्चा होईल असे जाहीर केले. त्याला सेना-राष्ट्रवादी-रिपाइंच्या नगरसेवकांनी विरोध केला. काही काँग्रेसजनही त्यात सामील झाले. राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांनी बाटल्यांतून आणलेले पाणी महापौर-आयुक्तांच्या टेबलावर ओतले. त्यातच गटनेते मकरंद सावे यांनी महापौरांसमोरील टेबलावर बैठक मारली. त्यानंतर चर्चेला मान्यता देण्यात आली. काँग्रेसच्या दीपक सूळ, लक्ष्मण कांबळे यांनीच विरोधी सूर लावला. दरम्यान, काँग्रेस गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी चर्चा थांबवून अजेंड्यावरच चर्चा करा अशी भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा गोंधळ झाला. तो इतका वाढला की एकमेकांना धरा-धरी झाली. काँग्रेसचे कैलास कांबळे राष्ट्रवादीच्या राजा मणियार यांच्यावर धावून गेले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या गोंधळातच काँग्रेसच्या नगरसेवकांनी सगळे विषय मंजूर-मंजूर असा धोशा लावला. राष्ट्रगीत सुरू करून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कोणत्याच विषयावर चर्चा न होता सभा गुंडाळण्यात आली.

त्या मंजुरीला अर्थ नाही
काँग्रेसने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर झाले असे जाहीर केले. मात्र, सभा सुरूच झाली नाही. विषयांचे वाचनच झाले नाही. मग कोणत्या विषयांना मंजुरी दिली हा प्रश्नच आहे. आम्ही आठ दिवसांपासून पाण्याच्या विषयावर चर्चेसाठी सभा बोलावण्याची मागणी करत आहोत. त्याकडे डोळेझाक झाली. साडेचार लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- शैलेश स्वामी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

विरोधकांचे गोंधळाला प्राधान्य
विरोधकांनी पाण्यावर चर्चेची मागणी केली. त्याला मंजुरीही दिली अन् चर्चा सुरू झाली. अजेंड्यावरील विषयांमध्येही पाण्याचे दोन विषय होते. मात्र, गोंधळ करण्याला विरोधकांचे प्राधान्य दिसून आले. त्यामुळे सभेत चर्चा होऊ शकली नाही.
- सुरेश पवार, उपमहापौर

महापौर रजेवर
महापौर स्मिता खानापुरे शुक्रवारच्या सभेकडे फिरकल्याच नाहीत. त्या रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उपमहापौर सुरेश पवार यांच्याकडे सर्वसाधारणसभा चालवण्याची जबाबदारी होती; परंतु गोंधळामुळे काहीच कामकाज झाले नाही.