आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कळसुबाई’चे पाणी लातूर-उस्मानाबादचे भाग्य बदलेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- राज्यातले सगळ्यात उंच अशी ओळख असलेल्या कळसुबाई शिखरावर पडणारे पाणी पाइपलाइनद्वारे मांजरा धरणात आणले तर लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. यासाठी लातूरचे अभियंता पांडुरंग तोडकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. माजी राज्यमंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रस्ताव मार्गी लावण्याची मागणी केली आहे. नेमकी ही योजना कशी आहे, पाणी कसे आणता येईल, किती पैसे खर्च होतील? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
नेमका प्रश्न काय आहे?
लातूर, उस्मानाबाद आणि बीड हे तिन्ही जिल्हे तसे अवर्षणग्रस्त. या भागात जास्तीत जास्त ८०० मिलिमीटर पाऊस पडतो. या परिसरात लहान-मोठी धरणे, तलाव बांधण्यात आले असले तरी वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे धरणांत पाणीसाठा होत नाही. मांजरा धरण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या आठ वर्षांत हे धरण एकदा शंभर टक्के भरले आहे.
सन २००८ पासून धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊसच नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून धरणातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. धरणावर अवलंबून असलेल्या लातूर, लातूर एमआयडीसी, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई या मोठ्या शहरांसह परिसरातील सिंचनावरही आपसूकच मर्यादा आल्या आहेत. हाच प्रकार लोअर तेरणा प्रकल्पाचा आहे. लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर बांधलेलं हे धरण गेल्या दहा वर्षांत एकदाही शंभर टक्के भरलेले नाही. गेल्या चार वर्षांत लाभक्षेत्रात पाऊस पडला नसल्यामुळे धरणातील पाणी जोत्याखाली आहे. उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के इतका आहे.

पाणी कसे आणता येईल?
लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे पठारावर असल्यामुळे नैसर्गिक प्रवाही पद्धतीने या भागात पाणी आणता येत नाही. उपसा सिंचन योजना या भागाला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे या परिसरात पडलेले पाणी वाहून न जाऊ देता ते जास्तीत जास्त जमिनीत मुरवणे हा पहिला उपाय आहे. कळसुबाईच्या शिखरावर पडणारे पाणी कालवा आणि बंदिस्त पाइपलाइनने या परिसरात आणता येऊ शकते, असा जलसंपदाचे निवृत्त अभियंता पांडुरंग तोडकर यांचा दावा आहे. ते म्हणतात, १६४६ मीटर उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर सरासरी २००० मिलिमीटर पाऊस पडतो. त्या शिखराच्या ९०० मीटर उंचीवर इंग्रजी वाय आकाराचा दोन किलोमीटर लांबीचा १०० मीटर खोलीचा कालवा तयार करावा. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या कालव्यांचा संगम जेथे होतो, त्या ठिकाणी १०० बाय १०० बाय ३ मीटर आकाराचा महाकाय हौद बांधावा. तेथून मांजरा नदीवर असलेल्या धनेगाव धरणापर्यंयतचे अंतर ३६० किमी आहे. या हौदातून एक डायमीटर आकाराची जलवाहिनी धरणापर्यंत अंथरली, तर प्रवाही पद्धतीने हे पाणी थेट धरणापर्यंत येईल.

लातूर, उस्मानाबादचा प्रश्न सुटेल
या योजनेसाठी आजच्या हिशेबानुसार सुमारे ४०० कोटी रुपयांचा खर्च येईल. कळसुबाई शिखरावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आणि बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यात येणार असल्यामुळे मांजरा धरणापर्यंत ५० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. दुसऱ्या एका पर्यायानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरखेडानजीक मांजरा आणि तेरणा या दोन्ही नद्यांचे लाभक्षेत्र आहे. तेथपर्यंत जलवाहिनीने पाणी आणले, तर दोन्ही नद्यांच्या पात्रात पाणी सोडता येऊ शकतो. त्यामुळे या नद्या मे महिन्यांपासूनच प्रवाही होतील, असा तोडकर यांचा दावा आहे.

अमित देशमुखांनी केली मागणी
अभियंता पांडुरंग तोडकर यांनी सुचविलेल्या मॉडेलचा प्राथमिक अभ्यास करून आमदार अमित देशमुख यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर याचे सादरीकरण करून त्यांना यातील उपयुक्तता निदर्शनास आणून देण्यात आली.