आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयगावात महिलांची पाण्यासाठी भटकंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढवून तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सियस पोहोचले आहे. नद्या, नाले, पाणवठे, विहिरी कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील खेड्यात राहणाऱ्या जनतेला आपली तहान भागवण्यासाठी दूर असलेल्या विहिरी, तलाव हातपंपांचा सहारा घ्यावा लागत आहे. गावागावांत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणा केवळ नावालाच उरल्या आहेत. या योजनांचा बट्ट्याबोळ होऊन यंत्रणेचा सर्वत्र बोजवारा उडाला आहे. त्यापाठोपाठ शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांची पाणीपुरवठा यंत्रणा कुचकामी ठरत आहे. उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे विद्युतपंप जळण्याच्या घटना घडत आहे. त्यातच लघु प्रकल्पात पाणीसाठा असतानाही या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे.
सोयगाव तालुक्यातून फर्दापूर, उमरविहिरे घाणेगाव तांडा येथील ग्रामपंचायतींनीच पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. यापैकी घाणेगाव तांडा, उमरविहिरे येथे तालुका प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार नरसिंग सोनवणे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच गावालगत असलेल्या विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. फर्दापूर येथे दरवर्षी ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
ग्रामस्थांना १०० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर काहींनी नळकनेक्शनद्वारे पाणी दरमहा घेऊन यावर उपाय शोधला आहे.पाणीटंचाईचा शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहेत.

^जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने विहिरी, हातपंप बंद पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच तालुका प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल येत आहे. सध्या तालुक्यात २५४ हातपंप असून शंभरावर बंद आहेत. नादुरुस्त हातपंपासंदर्भात ग्रामपंचायतीकडून ठराव आल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात येईल. बाजीरावकोलते, दुरुस्ती प्रमुख, पं.स.
बातम्या आणखी आहेत...