आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पेटले: सेनेच्या महिला नगरसेवकाने महापौरांकडे बाटली फेकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणीटंचाई उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित सभेत बोलताना नगरसेविका. - Divya Marathi
पाणीटंचाई उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित सभेत बोलताना नगरसेविका.
लातूर -पाणीटंचाई आणि त्यावरच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित महापालिकेच्या विशेष सभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला. बोलू देत नसल्याचे कारण सांगत शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता चाळक यांनी महापौर अख्तर मिस्त्री यांच्या दिशेने बाटली फेकली. त्यानंतर झालेल्या गदारोळात नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. गोंधळामुळे सभा दोनदा तहकूब करावी लागली.

दहा दिवसांआड येणारे पाणी बावीस दिवसांनंतरही आले नसल्यामुळे लातूरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या विषयावर चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी विरोधी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी विशेष सभा झाली. प्रारंभीच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला नगरसेवकांनी घोषणाबाजी करीत महापौर आणि आयुक्तांच्या टेबलावर पालथ्या घागरी आणून ठेवल्या. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे शैलेश स्वामी यांनी महापालिकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला. चार वर्षांत लातूर शहरासाठी राखीव ठेवलेले पाणी विकास, रेणा आणि मांजरा साखर कारखाने चालावेत म्हणून ऊस उत्पादकांच्या घशात घातल्याचा घणाघाती आरोप स्वामी यांनी केला. भंडारवाडीची योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे लातूरमध्ये पाणीटंचाई उद्भवल्याचे त्यांनी पुराव्यासकट सांगितले. राजा मणियार, विष्णू साठे, रवी सुडे या विरोधी नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभारावर आसूड ओढले. ही चर्चा सुरू असतानाच आपण वारंवार हात वर करूनही आपणाऐवजी काँग्रेसच्याच नगरसेवकांना बोलण्यास सांगितले जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या सुनीता चाळक यांनी महापौरांच्या दिशेने बाटली फेकली. अख्तर शेख यांनी ती हुकवल्यामुळे ते बचावले. त्यानंतर काँग्रेस आणि विरोधी नगरसेवकांत धुमश्चक्री उडाली. मोठ्या गदारोळातच एकमेकांना धक्काबुक्की करण्यापर्यंत नगरसेवकांची मजल गेली. त्यानंतर महापौरांनी २० मिनिटांसाठी सभा तहकूब केली. पुन्हा चर्चेला बसल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी सुनीता चाळक यांनी माफी मागावी; अन्यथा त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी लावून धरली. महापौरांनी चाळक यांना पुढच्या तीन सभांपर्यंत निलंबित केल्याची घोषणा केली. त्यावरून झालेल्या गदारोळात पुन्हा धक्काबुक्की झाली. त्यामुळे पुन्हा ३० मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सर्वच नगरसेवकांनी शांतपणे सहभाग नोंदवला.

नागझरीचे पाणी उसाला
गेल्या वर्षी कारसा पोहरेगाव बंधाऱ्यातील पाणी मांजराच्या पाइपलाइनद्वारे लातूरला आणण्याचे ठरले होते. मात्र, ते रद्द करून ऐनवेळी नदीपात्रातून पाणी सोडण्यात आले. परंतु ते पाणी नागझरी बंधाऱ्यात येईपर्यंत पात्रातच जिरून गेले. त्यावर मांजरा, विकास आणि रेणा कारखान्याचा ऊस पोसला. काँग्रेस नेत्यांचे कारखाने चालावेत म्हणून हा घाट घालण्यात आला. याही वर्षी नागझरी बंधाऱ्यात अडीच टीएमसी पाणी अवकाळी पावसाने साठले. मात्र, ते पाणी वापरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तेथे १५० मोटारींद्वारे पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे ते पाणी संपले अन् ऊस मात्र पोसला गेला. शैलेशस्वामी, राष्ट्रवादी नगरसेवक

आयुक्त तेलंग यांचे उत्तर
शासनाचाटंचाई आराखडा ३० जूनपर्यंतचाच असतो. तोपर्यंतचे नियोजन केले होते. सध्या मांजरा धरणात दोन दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्याद्वारे १५ दिवसांनी एकदा याप्रमाणे दीड महिना पाणीपुरवठा करता येऊ शकतो. शहरात पालिकेचे ६३३ बोअर आहेत. त्यातील १०८ बोअर पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर २०० बोअरचे पाणी कमी झाले आहे. भंडारवाडी धरणातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेने पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कायमस्वरूपी पर्यायी योजना म्हणून उजनी धरणातून पाणी आणता येईल काय, याचा अभ्यास सुरू आहे. शासनाकडून एमजेपीला पाहणी करण्याचे आदेश आले आहेत. त्यावर काम सुरू आहे, असे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

विरोधी नगरसेवकांचे प्रश्न
-भंडारवाडीचीयोजना का पूर्ण झाली नाही ?
-केवळटँकर सुरू आहेत, त्यावर तहान भागेल काय?
-मांजरातीलगाळ काढण्यासाठी काय प्रयत्न झाले ?
-पिण्यासाठीराखीव असलेल्या बॅरेजेसमधील पाणी का वापरत नाही?
-रेल्वेनेपाणी कसे आणणार? त्यातून किती पाणी येणार?
-चाळीसवर्षे सत्ता असणाऱ्यांना शाश्वत पाणी का आणता आले नाही?
-पाऊसपडलाच नाही तर पालिकेचा आराखडा तयार आहे काय?