आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Prepostion Cut Down ; Very Soon Marathwada Singing Song Come Rain, Come Rain

मराठवाड्याला म्हणावे लागणार ये रे... ये रे... पावसा! ,पावसाच्या प्रमाणात होतोय घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - भौगोलिक परिस्थिती, तापमानाचे घटणारे प्रमाण आणि जंगलाचा -हास या कारणामुळे मराठवाड्यातील पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. सध्याचे वातावरण असेच कायम राहिल्यास तीन-चार वर्षांनंतर मराठवाड्याला पुन्हा एकदा भीषण दुष्काळाचा सामना करीत ‘येरे येरे पावसा’ अशी आळवणी करावी लागेल, असा इशारा ‘एमजीएम’च्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी गुरुवारी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.


राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर संपूर्ण मराठवाडा हा सखल भागाचा प्रदेश आहे. पश्चिम घाट हा समुद्र सपाटीपासून 900-1200 मीटर उंचीवर असून तुलनेने मराठवाडा निम्म्या उंचीवर आहे. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हिंगोली सर्वाधिक उंचीवर अर्थात 665 मीटरवर आहे. साहजिकच या भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे ढग अडवण्याची जी नैसर्गिक क्षमता असायला हवी; ती मराठवाड्याला लाभली नाही. त्यामुळे उर्वरित विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. मान्सूनचे आगमन 7 जूनला गोवा, कोकण व दक्षिण महाराष्ट्रातून होते. या भागात भरपूर पाऊस झाल्यानंतर 10 जूनच्या आसपास मराठवाड्यात येईपर्यंत त्याचा वेग मंदावलेला असतो. मराठवाड्यात पर्जन्यमान कमी असण्याचे हेही एक कारण आहे.


भौगोलिक परिस्थिती, तापमान, जंगलांचा -हास यामुळे पर्जन्यमानात घट
1. तापमानातील घट
० गेल्या 12-13 वर्षांचा आलेख पाहिला तर तापमानात घट होत गेल्याचे दिसून येते.
० 2001 मध्ये उन्हाळ्यात कमाल 46.9
अंश से.पर्यंत गेलेले तापमान यावर्षी 44.9 अंशांपर्यंत खाली घसरले आहे.
० तरीही यावर्षी गेल्या 12 वर्षांच्या
तुलनेत तापमानात किंचित वाढ झाल्याने पर्जन्यमान ब-यापैकी आहे.
०तापमानात वाढ झाली नाही तर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यात अडथळे निर्माण होतात.
०त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होतो. यावर्षी तापमानात वाढ झाल्याने आणि ढगांनी दिशा बदलल्याने पाऊस लवकर आला.
2. कन्व्हेक्शन झोनचा प्रभाव
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या व परतीच्या काळात सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. दुपारनंतर पूर्व आकाशात ढगांची निर्मिती होते. वाढलेले तापमान व ढगांवरील वातावरणीय दाब, वा-याची साथ यामुळे कन्व्हेक्शन झोन अर्थात भार प्रभावित क्षेत्र निर्माण होते. यामुळे पाऊस कोसळतो.
3. जंगलांचा -हास
०मान्सूनच्या ढगांना आकर्षित करून पाऊस पाडण्याची नैसर्गिक शक्ती जंगलात असते.
०एकूण भूभागाच्या 33 टक्के जंगल असेल तर पर्यावरणाचा समतोल कायम राहतो.
०मराठवाड्याचा विचार केला तर या प्रदेशात केवळ 12 टक्के वन शिल्लक आहे.
०मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नांदेड (सरासरी 955) जिल्ह्यात होत असतो.
पुन्हा दुष्काळाचा धोका
तापमानाचा संबंध सूर्यावरील सौर डागाशी आहे. सौर डागाची सध्या 24 वी साखळी सुरू आहे. जून-जुलैमध्ये ते कमाल पातळीवर असेल. यावर्षी तापमानात (45 अंशांपर्यंत) वाढ झाल्याने चांगला पाऊस होईल; परंतु त्यानंतर सौर डाग कमी होत जातील. तापमानात घट होईल. त्याचा परिणाम पर्जन्यमानावर होऊन अजून तीन-चार वर्षांनी पुन्हा एकदा मराठवाड्याला पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागेल.
श्रीनिवास औंधकर,
संचालक, एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्र, नांदेड.
०नासा, यू. एस. नवल ऑब्झर्व्हेटरी आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सूर्याचा व्यास मोजण्याच्या प्रकल्पात डॉ. जयंत नारळीकर
आणि डॉ. नारायणचंद्र राणा यांच्यासमवेत सहभाग. ०सौर डागांचा पृथ्वीवरील हवामानावर होणा-या परिणामांचे अभ्यासक.