आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन स्रोत प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार- फौजिया खान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- राज्य शासनाने मंजूर केलेला सिंचन स्रोत विकास हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर चांगल्या प्रतीचे व अधिक प्रमाणात बियाणे उत्पादन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे बियाण्यांची मागणी पूर्ण करणे शक्य होईल, असे प्रतिपादन सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी शनिवारी येथे केले.
मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सिंचन स्त्रोत विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन फौजिया खान यांच्या हस्ते झाले. त्या वेळी खान यांनी शासनाकडून प्राप्त झालेला दोन कोटी रुपयांचा धनादेश विद्यापीठ नियंत्रक बी. जी. खेडकर यांच्याकडे सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे अध्यक्षस्थानी होते. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने विद्यापीठाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यवस्थापन कौशल्य व सामुदायिक प्रयत्नांच्या आधारे विविध शाश्वत विकासकार्ये विद्यापीठात सुरू असल्याचे राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले. शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य डॉ. व्ही. बी. शेळके, कुलसचिव डॉ. बी. एम. ठोंबरे, विद्यापीठ अभियंता डी. डी. कोळेकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक कडाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मदन पेंडके यांनी केले, तर प्रा.अनिस कांबळे यांनी आभार मानले.
50 हेक्टरची सिंचन सुविधा- प्रकल्पांतर्गत मोठय़ा आकाराचे शेततळे घेण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सहकार्याने हे काम करण्यात येत असून हे शेततळे पूर्ण झाल्यानंतर 300 कोटी लिटर पाण्याची साठवण होणार आहे. त्यातून साधारणत: 50 हेक्टर जमिनीवरील पिकांना संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात पिंगळगड नाल्याचे रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरण तसेच बंधारे बांधण्याचे काम प्रस्तावित असून यामुळे संशेधन व शैक्षणिक कार्यासही मदत होणार आहे. प्रकल्पाचा विस्तार करून भविष्यात विद्यापीठात कृषी पर्यटन प्रकल्प राबवण्याचा विद्यापीठाचा मानस कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी व्यक्त केला.