आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावरगाव प्रकल्पातील पाणी शेतीपासून दूर..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड - तालुक्यातील डावरगाव लघु प्रकल्पातून पाणी शेतक-यांना मिळत नाही. शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतक-यांनी वारंवार अधिका-यांना निवेदने दिली असली तरी पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतक-यांनी आता पालकमंत्र्याकडे धाव घेतली आहे.
अंबड तालुक्यातील डावकर लघु प्रकल्प हा 1962 मध्ये पूर्ण झाला आहे. कालव्याची एकूण लांबी 600 किलोमीटर असून मायनरची लांबी 1300 मीटर आहे. या प्रकल्पाअंतर्गत 485.49 हेक्टर ओलिताखाली येते. सध्या हा कालवा शंभर टक्के भरलेला असून या कालव्यातील पाणी चा-यांच्या माध्यमातून डावरगाव, पावसे पांगरी, कौडगांव, लखमापुरी, या भागातील शेतक-यांना 1994 पर्यंत देण्यात येते होते. नंतर मात्र पाणी सोडणे बंद करण्यात आले होते. कालवा शंभर टक्के भरला असला तरी शेतक-यांना मात्र पाण्यासाठी वेठीस धरण्यात येत आहे. या भागातील शेतक-यांना गहू, ज्वारी, ऊस, मोसंबीला पाणी देण्याची नितांत गरज असतांना आणि पाणी साठाही मुबलक असतांना या कालव्यातून पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतक-यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या धरणातून शेतीसाठी पाणी देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या भागातील शेतकरी लोकप्रतिनिधींना जाब विचारल्या शिवाय राहणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कागदपत्रांची पूर्तता करणार - डावरगाव प्रकल्पातून शेतक-यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासंदर्भात लवकरात लवकर शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून पाणी सोडण्यात येईल. - एस.एस. काळे, उपअभियंता, जालना