आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Question : Three Lakhs Collecting Through Citizens Participation

पाणी प्रश्‍न : लोकसहभागातून जमा केला तीन लाख रुपयांचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - गावात पहिल्यांदाच दुष्काळ पडला अन् कधी नव्हे ते टँकरची मागणी करण्याची वेळ आली. ग्रामस्थांनी असे का झाले, याचा शोध घेतला आणि नेमके कारण लक्षात येताच शासनाच्या मदतीची वाट न पाहता निझामकालीन तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यासाठी शेकडो हात सरसावले. 1 लाख 20 हजार ब्रास गाळ काढण्यात येणार असून पाच गावांतील शेती सुपीक होणार आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही निकाली निघेल.


लोहा तालुक्यातील पोलिसवाडी या गावात निझामकालीन तलाव आहे. हा तलाव आजपर्यंत कधीच आटला नव्हता. पहिल्यांदाच हा तलाव कोरडा पडल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली. इतरत्र कुठेही कितीही टंचाई असली तरी पोलिसवाडीस टंचाईची झळ आजपर्यंत पोहोचली नव्हती. कधीच टँकरची मागणी आली नाही. निझामकालीन तलावात असलेली कमळाची फुले पाहण्यासाठी लोक येत. हा तलाव गावच्या सुंदरतेत भर घालत असे. बाजूला असलेल्या नागमोडी मंगळूर घाटातून या तलावाचे विलोभनीय दृश्य नांदेड-लातूर या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना आकर्षित करत असे. मात्र, या वर्षी तलावच कोरडा पडल्याने उन्हाळ्यात फुलणारी कमळपुष्पे लोप पावली. गावात तीव्र टंचाई निर्माण झाली. महिन्यानंतर टँकर सुरू झाले. तलावातले पाणी का आटले याचा शोध घेतला. अनेक वर्षांपासून तलावातील गाळच काढण्यात आला नाही, मग पाणी कसे साचेल, हा मुद्दा लक्षात आला. पुढील वर्षी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचे ग्रामस्थांनी ठरवले. शासकीय मदत न घेता हे काम पूर्ण करण्याचे ठरले. यासाठी शेकडो हात सरसावले आणि बघता बघता तीन लाखांचा निधी जमा झाला.


तीन हजार हेक्टर जमीन सुपीक होणार
*पोलिसवाडी गावची लोकसंख्या दीड हजार आहे. 28 एकर परिसरात तलाव असून 15 फूट खोल गाळ काढण्याचे नियोजन आहे.
*1 लाख 20 हजार ब्रास गाळ काढण्यात येणार आहे. पाचही गावांतील शेतकरी एका ट्रॅक्टरच्या गाळासाठी 300 रुपये देतात. यातूनच जेसीबी आणि ट्रॅक्टरचा खर्च भागवला जातो. 6 जेसीबी आणि 7 ट्रक्टरच्या माध्यमातून गाळ काढण्यात येत आहे.
*आतापर्यंत 25 लाख रुपये खर्च झाला असून 12 हजार ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. सुमारे 24 हजार ब्रास गाळ आतापर्यंत काढण्यात आला असून 20 टक्के काम झाले आहे.
*पाणीटंचाईच्या निवारणार्थ दोन ते तीन दिवस 2 टँकर सुरू केले होते. मात्र, गावातील विहीर अधिग्रहित केल्यानंतर टँकर बंद करण्यात आले.


12हजार ट्रॅक्टरने गाळ काढला
05 गावांचा पाणीप्रश्न मिटणार

ग्रामस्थांची साथ महत्त्वपूर्ण
आपली समस्या आपणच सोडवावी लागते. शासनाकडे याचना करत बसलो तर आयुष्यभर टंचाईला तोंड द्यावे लागले असते, ही बाब गावक-यांनी हेरली. गावाची शान असलेला तलाव पुन्हा आटू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लोकसहभागातून गाळ काढण्याचा निर्धार केला.’’
पिराजी धुळगंडे, सरपंच, पोलिसवाडी, ता. लोहा.


पुढे काय?

गाळ काढण्याच्या मोहिमेनंतर पोलिसवाडीच नव्हे, तर मंगरूळ, बेरळी, देऊळगाव, चितळी या पाच गावांना दिलासा मिळू शकतो. तलावाच्या खालच्या बाजूला विहीर आहे. या विहिरीतूनच पाचही गावांना पाणीपुरवठा होतो. गाळ काढल्यास या विहिरीला चांगले पाणी लागेल. यामुळे या गावांचा पाणीप्रश्न कायमचा मिटू शकतो. याशिवाय अडीच ते तीन हजार हेक्टर जमीन सुपीक होणार आहे.