आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1500 टीएमसी पाणी अडवण्याची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मराठवाड्यातील अनेक भागांत यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अद्याप अनेक धरणे कोरडीच आहेत. या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यात 1500 टीएमसी पाणी अडवण्याची गरज आहे, असे जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, राज्याच्या अनेक भागात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मराठवाड्यातील 17 तालुक्यांत यंदा 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड आणि लोहा या दोन तालुक्यांत 50 टक्क््यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातही वार्षिक सरासरीच्या केवळ 36 टक्केच पाऊस झाला आहे. जून महिन्यात 7 दिवस, जुलै महिन्यात 19 दिवस, तर ऑगस्ट महिन्यात 2 दिवस पाऊस झाला आहे. खरीप पिकांना हा पाऊस पोषक असला तरी पुढच्या वर्षीचे पाणीटंचाईचे संकट कायम आहे. ऑगस्ट महिन्यात धरणे तुडुंब भरलेली पाहिजेत, परंतु वास्तवात अनेक धरणे कोरडीच आहेत. सिद्धेश्वर धरणात तर शून्य टक्के पाणीसाठा आहे.
1200 टीएमसी पाणी अडवले - जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याला लवादाकडून 1800 टीएमसी पाणी मिळाले आहे. गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदा खो-यांतील हे पाणी आहे. या पाण्याची साठवणूक करण्यासाठी 2700 टीएमसी पाणीसाठा असण्याची गरज आहे, परंतु प्रत्यक्षात राज्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा केवळ 1200 टीएमसी एवढाच आहे. गेल्या 60 वर्षांत केवळ 1200 टीएमसी पाणी आपण अडवू शकलो. अजून 1500 टीएमसी पाणी अडवण्याची गरज आहे. हे कधी अडवले जाईल आणि त्याला किती कालावधी लागेल हे सांगणे अवघड आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करावयाची असेल, तर हे करणे गरजेचे आहे. त्याशिवाय अन्नधान्याचे उत्पादन वाढणार नाही आणि पिण्याला पाणीही पुरेसे मिळणार नाही. पावसाचे प्रमाण कमी झालेले नाही. पाऊस अजूनही तेवढाच पडतो. केवळ त्याचे वेळापत्रक बदलले आहे, परंतु पुरेसे पाणी साठवण्याची क्षमताच उपलब्ध नसल्याने दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागते. एक वर्ष पाऊस पडला नाही तरी पाणीसाठा पुरेल असे नियोजन
करणे गरजेचे आहे, असेही जाधव म्हणाले.