आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Shortage At Auragabad And Jalna, News In Marathi

टंचाईच्या झळा: पाऊस लांबल्यास औरंगाबाद, जालना शहरात पाणी टंचाई!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी पाणी सोडण्यात आले खरे; मात्र यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात झपाट्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत जर यंदा पाऊस वेळेवर आला नाही तर औरंगाबाद, जालना शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

सिंचनासाठी लागणार्‍या पाण्याची गरज लक्षात घेता 15 मे रोजी पहिल्यांदा डाव्या कालव्यातून 400 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले, तर 20 मेच्या रात्री उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्यात आले. हे पाणी साधारण आणखी 10 ते 15 दिवस सुरू राहणार आहे. रोज एकूण 700 क्युसेक पाणी जात असल्याने सिंचनाचा प्रश्न तूर्त तरी मिटला आहे. मात्र, धरणाचा साठा कमी होत आहे. सध्या 14 टक्क्यांवर असलेला जलसाठा पाच टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप महिना बाकी असल्याने धरणातील पाणी पुरेसे वाटते. परंतु पाऊस वेळेत न आल्यास औरंगाबाद, जालना, पैठणसह औद्योगिक वसाहतीला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

वैजापूर-गंगापूरलाही फटका
वैजापूर- वैजापूर-गंगापूर तालुक्यांसाठी तिसर्‍या आवर्तनाचे नांदूर-मधमेश्वर जलद कालव्याचे पाणी न सोडण्याची नाशिक पाटबंधारे विभागाची भूमिका संशयास्पद असून कार्यकारी अभियंता एस. के. बाफना यांच्या घूमजाव धोरणामुळे वैजापूर तालुक्यावर तीव्र पाणीटंचाई ओढवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नांदूर-मधमेश्वर कालव्याचे रब्बी हंगामातील तिसरे आवर्तन सुरू असताना नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बाफना यांनी आवर्तन पूर्ण होण्याअगोदर वितरिका क्रमांक 1 ते 12 ला पाणी देणे बाकी असताना अचानक वैजापूरच्या नांमका कार्यालयाला फॅक्स पाठवून पाणी बंद केले आहे. औरंगाबाद, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य व अधीक्षक अभियंता, नांमका व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या संयुक्त पाणी वाटप नियोजन समितीच्या बैठकीत ठरवण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन मला मान्य नव्हते, असे वक्तव्य करून दोन जिल्ह्यांत वाद निर्माण केला आहे. नियोजित पाणी कपात करण्याचा या अधिकार्‍यास कोणी अधिकार दिला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यामागे कोणाचा हात आहे, असा संतप्त सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.

ज्या वेळी शिवसेनेचे शिष्टमंडळ बुधवारी नाशिकचे कार्यकारी अभियंता बाफना यांना भेटले त्या वेळी वेळोवेळी बाफना म्हणाले की, पाणी सोडण्यासाठी नियोजन केले असून वरिष्ठांकडे धरण ते नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअरपर्यंत असलेली वीज तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर तुम्हाला पाणी सोडण्यात येणार आहे. आमच्याकडे औरंगाबादचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग यापैकी कोणीही मागणी केली नाही. धरणात केवळ पाणीटंचाईसाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. पाण्याचे नियोजन आता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले.