आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - तालुक्यात सलग तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यातच यावर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. यामुळे आगामी 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा प्रकल्पात राहिल्याने शहरवासियांना पावसाळ्यातच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
तालुक्यात प्रकल्पांची संख्या जास्त असून ग्रामीण भागात पाच गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच 23 गावे, वाड्या-वस्त्यांवर 97 विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. शहरासाठी पाणीपुरवठा करणारे एकमेव स्रोत खासापुरी मध्यम प्रकल्प असल्याने आगामी काळात पाऊस झाला नाही तर जेमतेम पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. नगरपालिकेने याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे 20 टँकरची मागणी केली आहे. शहरासाठी दररोज 7 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहरातील लोकसंख्या 20 हजारांपेक्षा जास्त असल्याने प्रत्येकास दररोज 35 लिटर पाणी आवश्यक आहे.

उपाययोजनेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे 20 टँकरची मागणी , खासगी टंँकरचे भाव वाढले
अशी आहे धरणांची स्थिती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पात तीन वर्षांपासून पाणीसाठा झालेला नाही. प्रकल्पात सध्या 6.80 दलघमी पाणी असून पुढील काळात पाऊस न झाल्यास हा प्रकल्प कोरडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साकत, चांदणी व खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प तीन वर्षांपासून कोरडे पडल्याने परिसरातील शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. परिणामी शेतकर्‍यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.

खासगी पाणीपुरवठादारांची मक्तेदारी
शहरात खाजगी टँकरद्वारे बारमाही पिण्याचे पाणी नागरिक प्रतिघागर तीन रुपयांप्रमाणे विकत घेतात. पाणीटंचाईच्या काळात खासगी टँकर भाववाढ करून सामन्य नागरिकांना वेठीस धरतात. आगामी काळात पाऊस झाला नाही तर पाच रुपयांप्रमाणे एक घागर पिण्याचे पाण विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. तर खासगी टँकरवाले आपले उखळ पांढरे करून घेतील. त्यामुळे शासाने विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करणे गरजेचे आहे.
पाणीउपशाचा फटका
खासापुरी मध्यम प्रकल्पात गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसाने सहा मीटर पाणीसाठा झाला होता. परंतु, परिसरातील शेतकर्‍यांनी बेसुमार पाणी उपसा केल्याने पाणीसाठा कमी होऊन प्रकल्प कोरडा पडला आहे. पाणी उपसा झाला नसता तर शहरवासियांची पावसाळ्यापर्यंत तहान भागली असती.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी स्थिती तालुका व शहर परिसरातील नागरिकांची झाली आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. विहिरी, कूपनलिका, हातपंपांची पाणीपातळी खालावल्याने कोरडे पडले आहेत. दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन व शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा
४शहरासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या खासापुरी प्रकल्पातील पाणी पंधरा दिवस पुरेल एवढेच शिल्लक आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 20 टँकरची मागणी केली आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरात पाणीपुरवठा करून टंचाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
समीर भूमकर, मुख्याधिकारी

शेतकर्‍यांना नोटिसा

४खासापुरी प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली असून प्रकल्पातील व परिसरातील पाणी उपसा बंद आहे. शेतकर्‍यांना दोन महिन्यापूर्वीं नोटिसा दिल्या आहेत. तसेच कारवाई करण्यात आली आहे. ’’
ए. बी. कुलकर्णी, शाखाधिकारी खासापुरी मध्यम प्रकल्प.
(फोटो - परंडा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खासापुरी मध्यम प्रकल्पातील पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहरवासीयांना आगामी काळात भीषण पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. छाया: दिव्य मराठी)