आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याने चार दिवसांपासून पाणी बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर - परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पातून लातूरला पाणी देण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु परतूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदवाडी गावात मात्र पाणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रदिनी टँकरद्वारे पाणीवाटपादरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण झाली होती. तेव्हापासून गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. पाण्याचा इतर कुठलाही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

परतूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आनंदवाडी या दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच गावातील पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली. परिणामी, पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू झाली. गावाला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक विहीर आटल्याने व परिसरातील सर्व जलस्रोत कोरडे पडल्याने जानेवारीपासून गावाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. एप्रिल महिन्यात टंचाई स्थिती वाढल्याने अजून एक टँकर वाढवावे लागले; परंतु अशाही स्थितीत पाणी पुरेसे ठरत नसल्याने पाणी भरण्यावरून ग्रामस्थांचे वाद होतात. महाराष्ट्रदिनी गावात टँकरचे पाणी वाटप करत असताना ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कर्मचारी ज्ञानेश्वर मोहिते याला गावातीलच ओमप्रकाश उकंडे याने जास्तीचे पाणी का दिले नाही या कारणावरून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ज्ञानेश्वर मोहिते बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळलेे. ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात नेल्याने त्यांचे प्राण वाचले. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी भयभीत असून एक मेपासून गावात एकही टँकर आलेले नाही. पूर्णत: टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावात चार दिवसांपासून टँकर न आल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.

गावातील काही मोजक्या बोअरला पाणी आहे. दोन रुपयांना
एक हंडा पाणी या पद्धतीने बोअरमालक पाणी देतात, तर दुसरीकडे खासगी टँकर लॉबीने टंचाईचा फायदा घेत २५० लिटरची टाकी १०० रुपयांना विकण्याचा सपाटा लावला आहे. रोजगार नसल्याने उत्पन्नाचे साधन नाही व त्यात पाण्यासाठी पैसा कसा खर्चायचा असा सवाल, शेतकरी, शेतमजुरांपुढे आहे.

पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाहीत
चार दिवसांपासून गावात शासकीय पाण्याचे टँकर आलेले नाही. खासगी टँकर येते, पण पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. गावात रोजगार नाही, कसेबसे दिवस काढत असताना पाणी विकत घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. पाणीबाणी निर्माण झाली आहे.
सोपान तातेराव तांबे, ग्रामस्थ, आनंदवाडी.

दबाव टाकला जातो
गावात पाणीपुरवठा करताना काही मंडळींकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. एक मे रोजी पाणीवाटपाच्या कारणावरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. यापुढे वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. - ज्ञानेश्वर मोहिते, पाणीपुरवठा कर्मचारी, आनंदवाडी

गावचा पाणीपुरवठा सुरळीत करणार
चार दिवसांपासून गावात पाणीपुरवठा होत नसेल तर सत्यता पडताळून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच गावात कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोजगार मिळावा, यासाठी आनंदवाडीत रोहयोअंतर्गत कामे सुरू केेले जातील. - विनोद गुंडमवार, तहसीलदार, परतूर.
बातम्या आणखी आहेत...