आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Supply News In Marathi, Water Tanker Issue At Vaijapur, Divya Marathi

टँकरला डिझेल नसल्याने पाणीपुरवठय़ालाच खो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- धोंदलगावला शासकीय टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे चार दिवसांपासून ठप्प झाला आहे. शासनाच्या वतीने या दोन टँकरला डिझेल पुरवठा केला जात नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची पुन्हा चार दिवसांपासून होरपळ सुरू झाली आहे. जानेवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाईच्या फेर्‍यात अडकलेल्या धोंदलगावाला टंचाई उपाय योजनेतून दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता डिझेलअभावी दोन्ही टँकर जागेवर उभे राहिले आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बोरसर जिल्हा परिषद गटातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या धोंदलगावसाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून दहा हजार लिटर क्षमता असलेल्या दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दोन टँकर गावात दिवसातून चार खेपा करतात. दहेगाव येथे अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून टँकरच्या चार खेपा गावातील सार्वजनिक विहिरीत टाकतात. त्यानंतर विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, 16 फेब्रुवारीपासून या गावाला पाण्याची खेप घालणार्‍या दोन्ही शासकीय टँकरना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून डिझेलचा पुरवठा केला जात नसल्यामुळे टँकर चालकाने डिझेल मिळाल्यानंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगून टँकर दहेगाव येथे डिझेलच्या प्रतीक्षेत उभे करून ठेवले आहे.

धोंदलगावात चार दिवसांपासून डिझेलअभावी पाणीपुरवठा न झाल्यामुळे ग्रामस्थासह पशुधनाची पाण्यासाठी परवड सुरू झाली. त्यामुळे महिला, नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याप्रकरणी सरपंच सुषमा वाघ, उपसरपंच संजय शेटकर आदी पदाधिकार्‍यांनी डिझेल पुरवण्याअभावी खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी पंचायत समितीच्या खेट्या घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन ताटकळत ठेवत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

पाणीटंचाईचे गांभीर्य नाही
धोंदलगावला टंचाई उपाय योजनेतून दररोज 40 हजार लिटर पाण्याच्या खेपा घालणार्‍या टँकरला पाणी वाहतुकीसाठी डिझेल पुरवठा वेळेवर होत नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी परवड होत आहे. त्यातच पंचायत समितीच्या प्रशासनाला परिस्थितीचे काहीच गांभीर्य नाही.- सुषमा वाघ, सरपंच

डिझेलची मागणी केली
पाणीपुरवठा करणार्‍या शासकीय टँकरला डिझेल पुरवठा करण्याची मागणी पुरवठा विभागाने बीडीओकडे पाठवली आहे. अद्यापही मागणी बीडीओकडे पडून आहे. के. पी. कड, अभियंता, पाणीपुरवठा विभाग

या गावातही फेर्‍या बंद
शिवराईचे दोन टँकर चार फेर्‍या, परसोड्याचा एक टँकर दोन फेर्‍या, बाबतारा एक टँकर दोन फेर्‍या पाणीपुरवठा विभागाला जो निधी तत्काळ खर्चासाठी आहे त्याचे रजिस्टर अद्ययावत झाले नसल्याने टँकरच्या डिझेलसाठी पैसे देण्यात अडचणी होत आहे. लहानुबाई डिके, सभापती