आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मापात पाप ; वीस हजार लिटर क्षमतेच्या टँकरला दोन खेपांत मिळायचे कमी पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर कासार- ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती थांबवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या टँकरमधील घोळ बुधवारी ग्रामस्थांनीच चव्हाट्यावर आणला. वीस हजार लिटर पाण्याची वाहतूक करणार्‍या टँकरमधील एक कप्पा बाहेर ठेवून एका खेपेमागे पाच हजार लिटर पाण्याची चोरी पकडून महसूल यंत्रणेला पंचनामा करण्यास भाग पाडले !

दुष्काळात नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे. मागणी करताच तहसीलदारांच्या अधिकारात सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील आर्वी गावामध्ये माणशी वीस लिटरप्रमाणे दररोज ग्रामस्थांना एक लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बारा हजार लिटर क्षमता असलेले पाण्याचे दोन टँकर सुरू करून दोन्हीच्या प्रत्येकी तीन खेपा कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली, परंतु तहसील प्रशासनाने आर्वीत पाच हजार लोकवस्ती ग्राह्य धरून वीस हजार लिटर क्षमतेचे एकच टँकर सुरू केले, त्याच्या तीन खेपा करण्याला मंजुरी दिली, परंतु खंडित वीजपुरवठय़ामुळे ग्रामस्थांना टँकरच्या दोनच खेपा मिळतात. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.

वीस हजार लिटर पाणी एका खेपेला मिळायला हवे. असे असताना टँकरचे पाणी कमीच येते, अशी शंका गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांना आली. त्यामुळे गावातील काही युवकांनी बुधवारी जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना फोन करून टँकरचा प्रकार कानी घातला. दुपारी गावात टँकर येताच तपासणी केली. तपासणीत टँकरचा पाच हजार लिटर पाण्याची क्षमता असलेला एक कप्पा बंद असल्याचे अन् एका खेपेमागे पाच हजार लिटर पाणी चोरण्यात येत असल्याचे उघडकीस आले.

पाणीचोरी निंदनीय-
पाणीपुरवठय़ातील असे प्रकार निंदनीय आहेत. आम्हाला मागणीप्रमाणे पाणीच मिळत नव्हते. आता तरी हे टँकर बंद करून बारा हजार लिटरचे दोन टँकर मिळावेत.'' दीपक नागरगोजे, माजी उपसरपंच

नियमाप्रमाणे पुरवठा- रस्ता खराब असल्याने थोडे कमी पाणी आले असेल. मात्र, टँकरची क्षमता वीस हजार लिटरपेक्षा जास्त असल्याने नियमाप्रमाणे पाणीपुरवठा होत होता.'' रामदास हंगे, टँकरमालक

एक कप्पा बंदच होता- दुपारी गावात टँकर आल्यानंतर आम्ही तपासणी केली. टाकीतील केबिनच्या मागील एक कप्पा बंद आढळला. खेपेला आम्हाला पाच हजार लिटर पाणी कमी मिळत होते. '' अशोक भोकरे, ग्रामस्थ, आर्वी