आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 336 गावे पाणीदार; जैन संघटनेने घेतला पुढाकार, लातूरमधील 32 गावांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लातूर - गतवर्षी राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर  भारतीय जैन संघटनेने सिनेअभिनेता अामिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने वाॅटर कप स्पर्धेत  सहभाग घेत राज्यातील ३३६ गावे पाणीदार करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यात लातूर जिल्ह्यातील ३२ गावांचा समावेश आहे. ही माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी दिली.  

कोणतीही आपत्ती, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भारतीय जैन संघटना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतीसाठी पुढे सरसावल्याचे सर्वांनी  पाहिले, अनुभवले असल्याचे सांगून प्रफुल्ल पारख म्हणाले की,  श्रमदानावर  आधारित या स्पर्धेत सर्वच कामे मानवी हातांनी  पूर्ण करताना त्याला मर्यादा येतात. त्याचे भान राखून भारतीय जैन संघटनेने मानवी दृष्टिकोनातून एकत्रित आलेल्या या हातांना यंत्राची साथ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.  एकाच वेळी राज्यभरातील ३३६ गावांना पोकलेन, जेसीबी उपलब्ध करून देताना संघटनेला आपला आपत्ती निवारण काळात केलेल्या कार्याचा अनुभव, अत्यंत काटेकोर नियोजन आणि महाराष्ट्रासोबतच अन्य राज्यांत असलेले संपर्काचे भलेमोठे जाळे याचा खूप फायदा झाल्याचे पारख यांनी सांगितले.  संघटनेने दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत ४९० पोकलेन, जेसीबींचा वापर करून ही गावे पाणीदार बनविण्याचे काम केले असून लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यातील ३२ गावांमध्ये ४५ मशीन्सच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे.  
 
अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ  अशा  १३ जिल्ह्यांतील  ३० तालुक्यांतील  ३३६ गावांत हे कार्य करण्यात आले आहे.  भारतीय जैन संघटनेने या स्पर्धेत श्रमदानाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या सर्व गावांना त्या गावातील कठीण कामे जेसीबी - पोकलेनच्या माध्यमातून करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.  फक्त दीड महिन्याच्या कालावधीत एवढे मोठे काम पूर्ण करण्याचे आव्हान संघटनेसमोर होते.  त्यासाठी संघटनेने ३० तालुक्यांत ४० लोकांच्या नियुक्त्या करून यंत्रणा गतिमान  केली. या अभियानासाठी एकूण २७१ जेसीबी व  २१९ पोकलेन उपयोगात आणली गेले.  या अभियानासाठी  आलेला चार कोटींचा खर्च भारतीय जैन संघटनेने समाजबांधवांकडून मिळालेल्या देणगीतून केला. या अभियानासाठी शांतीलाल मुथा  यासह  समाजातील अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. अभियानांर्तगत काम करताना आवश्यकता भासल्यानंतर परप्रांतातूनही मशीन्स मागविण्यात आल्या.  पश्चिम महाराष्ट्रात मशीन सहज उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.  
 
खांडवा भागातून जेसीबी  
खोदकाम करण्यासाठी मशीन उपलब्ध करताना  बीड व उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास झाला. खास करून विदर्भात तर मशीनची संख्याच मुळात कमी असल्याने तिथे तर हे काम करणे जवळजवळ अशक्यच होते. स्थानिक सरपंचांनी मशीन मालकांना शोधून-शोधून आणले. म्हणून ही कामे होऊ शकली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आदिवासी भागात तर मशीनच उपलब्ध होत नव्हते. शेवटी   मध्य प्रदेशातील खांडवा भागातून जेसीबी आणि पोकलेन आणून दुष्काळाची कामे करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
६५० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी    
भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ६५० मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या अभियानात भारतीय जैन संघटनेच्या आजी - माजी विद्यार्थ्यांचे श्रमदानही अत्यंत उल्लेखनीय  असल्याचे त्यांनी नमूद केले.  अभियानात लोकांनी केलेल्या सहकार्याचे मोल होऊ शकत नाही. अशी कामे नेहमी होत नाहीत. आजघडीला केलेल्या कामाची स्थायी स्वरूपात निगा राखली गेली तर पाणीप्रश्न कायमचा सुटू शकतो, असेही पारख म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...