आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • We Should Save Water Said Marathi Actor Makrand Anaspure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा, पाणी वाचवा, सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे याचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाड्यासह राज्यात ठिकठिकाणी मागील चार वर्षांपासून दुष्काळ पडत असून शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. पिण्यासह शेतीला पुरेसे पाणी नसल्यामुळे वाईट अवस्थेत जगावे लागत आहे, हेच आयुष्य आपल्या मुला-बाळांना देणार का, असा प्रश्न करत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवा, बेहिशेबी पाणी उपसा बंद करा. पुढच्या पिढीसमोर चांगला आदर्श ठेवा, असा मोलाचा सल्ला सिनेअभिनेते तथा स्वच्छता दूत मकरंद अनासपुरे यांनी दिला. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता रेल्वेस्टेशन रोडवरील एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी दै. दिव्य मराठीशी केलेली बातचीत त्यांच्याच शब्दांत...

स्वच्छता ही मूलभूत गोष्ट आहे. घराघरात लक्ष्मीपूजा केली जाते. लक्ष्मी म्हणजे समृद्धी. यामुळे केरसुणीला पाय लागल्यावर आई लगेचच पाय पडायचे सांगते. घरातील अस्वच्छता दूर करण्याचे काम केरसुणी करते. स्वच्छतेनंतर घरात लक्ष्मी येते. याचबरोबर आपण गणपती व सरस्वती पूजन करतो.
गोगलगावने मला दत्तक घेतले
मी गोगलगाव दत्तक घेतले म्हणण्यापेक्षा गावानेच मला दत्तक घेतले, असे म्हणता येईल. कारण, मी साधा-सरळ माणूस आहे. आमदार-खासदारांकडे निधी असतो, ते गाव दत्तक घेऊ शकतात. मला घर-संसार सांभाळण्यासाठी काम करावे लागते, त्यामुळे वेळ मिळेल तसे काम करतो. लोकसहभाग वाढल्याने गोगलगावात विकासकामे सुरू झाली, लोकसहभाग हा विकासाचा पाया आहे.

बचतीने पुढच्या पिढीपुढे आदर्श ठेवा
सध्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे पाण्याचा बेसुमार उपसा बंद करून पाण्याचा नियोजित वापर करावा. सर्वांना जगायचे आहे. इस्रायलमध्ये १ मि.मी.सुद्धा पाणी वाया जात नाही. यावरून पाण्याचे महत्त्व लक्षात येते. आपण वाईट अवस्थेत जीवन जगत आहोत, मुलांनासुद्धा हेच आयुष्य देणार का.. नाही ना? म्हणून आपणही जलसंधारण व वृक्षारोपण करून पुढच्या पिढीपुढे आदर्श ठेवावा.
शेतकऱ्यांनाे, जिद्द ठेवा
जाफराबाद तालुक्यातील आडा येथील तेजराव कन्नर या शेतकऱ्याने दोन्ही हात नसताना भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल एका चॅनलने अनन्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. यापासून प्रेरणा घेत प्रत्येक शेतकऱ्याने जिद्दीने संकटाचा सामना करावा. मात्र, खचून जाऊ नये.
रिअल हीरोला महत्त्व द्यावे
एका गुंठ्यात लाखांचे उत्पादन काढणारे अनेक शेतकरी आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांनी सलमान खानसारख्या रिअल हीरोएेवजी नियोजनपूर्ण शेती करून उत्पादन काढणाऱ्या शेतकरी अर्थात रिअल हीरोवर लक्ष केंद्रित करावे.