आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता-पित्याचे औक्षण करून मुलीच्या जन्माचे स्वागत; उस्मनाबादमधील गोजवाडा गावांचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशी- वंशाचा दिवा पाहिजे म्हणून जन्माला येण्याआधीच मुलींची गर्भातच हत्या केली जाते; परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील गोजवाडा गावात मागील ३ वर्षांपासून मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. ज्या घरात मुलीचा जन्म होतो त्या घरासमोर रांगोळी काढून, दारावर तोरण बांधून माता-पित्याचे औक्षण केले जाते. इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी प्रभात फेरी काढून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश देतात. आतापर्यंत २७ कुटुंबांचा याच पद्धतीने गौरव करण्यात आला. 
 
गावातील जि. प. शाळेतील शिक्षिका सी. एम. अंधारे यांच्या पुढाकारातून ही नवीन संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली. गावामध्ये ज्या कुटुंबांमध्ये मुलीचा जन्म होतो अशा तीन ते चार कुटुंबांचा एकाच दिवशी सत्कार सोहळा ठेवला जातो. ठरलेल्या दिवशी संपूर्ण गावाला याचे निमंत्रण दिले जाते. विद्यार्थी संत, महापुरुषांच्या वेशभूषेत पूर्ण गावातून प्रभातफेरी काढतात. यात मुलगी वाचवा, स्वच्छता राखा, पाणी जपून वापरा, शौचालयाचे बांधकाम करा आदी सामाजिक संदेश दिले जातात.    

अत्यंत उत्साहात निघालेली ही प्रभातफेरी मुलीच्या दारी पोहोचण्याआधी विद्यार्थीच गावातील या परिसराची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करतात. अत्यंत आकर्षक अशी भली मोठी रांगोळी काढून दारावर तोरण बांधले जाते. माता-पित्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना फुलांचा हार घालून एक-एक रोपटे भेट दिले जाते. हे अभियान राबवत असल्यापासून गावात सकारात्मक बदल पाहायला मिळत असल्याचे प्रयोगशील शिक्षिका सी. एम. अंधारे यांनी सांगितले.   

मूल्य शिक्षणाचा रचला पाया   
विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणावर अधिक भर दिला जातो. शिक्षकांच्या पुढाकारातून शाळेत शिवी बंद अभियान, स्वागत स्त्री जन्माचे, हरित रक्षाबंधन, फटाकेमुक्त दिवाळी, अनाथ विद्यार्थी दत्तक पालक आदी अभियान राबवण्यात आले. यात सरपंच अबोली मस्के, केंद्रप्रमुख एस. आर. कुलकर्णी, मुख्याध्यापक एस. व्ही. ठाकर, मनीषा थोरबोले, भिकाजी जाधव यांचे सहकार्य लाभले.  
बातम्या आणखी आहेत...