आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Will Toll Free ? 30 New Toll Boothe Proposed In Maharashtra

कधी होणार टोलमुक्ती ? महाराष्‍ट्रात नव्याने 30 टोलनाके प्रस्तावित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - महाराष्‍ट्राचे राजकारण सध्या टोलवसुली आणि टोलमुक्तीवरून तापलेले असताना राज्यातून जाणा-या सहा राष्‍ट्रीय महामार्गांवर येणा-या काळात नव्याने 30 टोलनाके प्रस्तावित आहेत. राज्यातून जाणा-या 1625 किलोमीटर महामार्गाचे रुंदीकरण बीओटी तत्त्वावर केले जाणार असून, यासाठी प्रत्येक पन्नास किलोमीटरमागे एका टोलनाक्याची उभारणी होणार आहे. एकंदरीत सोलापूर ते औरंगाबादसाठी चारचाकी वाहनधारकास सव्वाशे रुपये मोजावे लागणार असून, हे टोल नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी इंडियाच्या अधिपत्याखाली असल्याने यावर राज्य शासनाचे कसलेही नियंत्रण राहणार नाही.
टोलवसुलीविरोधात कोल्हापूरकरांनी केलेल्या जनआंदोलनाने राज्य शासनाची झोप उडाली. हे आंदोलन अद्याप थांबलेले नसताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभरातील टोल नाक्यांना लक्ष्य करून टोल न भरण्याचा तसेच कोणी आडवे आल्यास फोडून काढण्याचा आदेश मनसे सैनिकांना दिला. याचे पडसाद राज्यभर उमटले, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आंदोलन कोणाचेही असले तरी टोलबाबत सर्वसामान्यांच्या मनात मात्र खदखद आहे. यामुळे राज्य शासन चिंतेत असताना केंद्राने मात्र महाराष्‍ट्रावर नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या माध्यमातून टोलधाड घातली आहे. यामध्ये राज्यातून जाणा-या सहा महामार्गांचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम बीओटी तत्त्वावर देऊन कामाच्या खर्चाची रक्कम टोलद्वारे वाहनधारकांच्या खिशातून वसूल केली जाणार आहे.
टोलच्या कचाट्यात सापडलेले 6 महामार्ग
* धुळे-भंडारा ४५० किमी ९ टोल
* कल्याण-नगर-नांदेड ३८५ किमी ६ टोल
* सोलापूर-धुळे ३०० किमी ६ टोल
* सोलापूर- उमरगा- २३४ किमी ४ टोल
* नाशिक-पुणे १८० किमी ४ टोल
* नागपूर- मध्य प्रदेश ७५ किमी १ टोल
सोलापूर- धुळे; सहा टोलनाके
राज्यातील सहा महामार्गांचे रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गांवर साधारणत: प्रत्येक 50 किमीवर टोलनाका उभारण्यात येणार आहे. याचा विचार करता सोलापूर- धुळे या 300 किमी अंतरासाठी 6 टोलनाके उभारले जाऊ शकतात. हा प्रवास कारने केल्यास वाहनधारकास 120 रुपये, तर अवजड वाहनास 425 ते 900 रुपयांपर्यंत टोल मोजावा लागेल. अशीच अवस्था या प्रकल्पांतर्गत रुंदीकरण होणा-या 1624 कि.मी. अंतरावर राहणार असून यासाठी या मार्गावर जवळपास 30 टोलनाके उभारण्यात येणार आहेत.