आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा रुपयांसाठी खून करणाऱ्याला जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव : पत्त्याच्या खेळात दहा रुपयांच्या देवाणघेवाणीवरून माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी माजलगाव येथील सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी किशोर लक्ष्मण मुनगुलवार याला दोषी ठरवत शुक्रवारी दुपारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
राजेगाव येथे ९ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी तीन वाजता सरकारी दवाखान्याच्या बाजूला पत्ते खेळताना मजूर किशोर तेलंग (मुनगुलवार) व अंगद रामप्रसाद इंगळे या दोघांत दहा रुपयांवरून वाद झाला. हा वाद राधाकिसन इंगळे यांनी मिटवून अंगद याला समजावत त्याला शेतातील म्हैस घेऊन येण्याचे सांगितले. अंगद हा सायंकाळी पाच वाजता शेताकडे निघाला तेव्हा वाटेत किशोर लक्ष्मण मुनगुलवार, रामू भीमराव टंकलवार, चित्राबाई लक्ष्मण मुनगुलवार हे तिघे तिथे आले.
किशोर याने चाकूने अंगद याच्या पोटावर सपासप वार केले. चित्राबाईने अंगदचा गळा दाबला, तर रामू टंकलवारने मानेवर दगड मारला. हा वाद पाहून त्या ठिकाणी राधाकिसन इंगळे, मधुर साळवे, अशोक इंगळे आले तेव्हा अंगद गंभीर अवस्थेत घटनास्थळी जमिनीवर पडला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

१२ साक्षीदार तपासले
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. तक्रारदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉ. रुद्रवार व तपास अधिकारी बी. ए. कदम यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. साक्षीपुराव्यावरून अप्पर सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांनी आरोपी किशोर मुनगुलवार यास कलम ३०२ प्रमाणे दोषी ठरवत जन्मठेप व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैदेची शिक्षा शुक्रवारी ठोठावली.
बातम्या आणखी आहेत...