आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील पोलिओ बळीची जागतिक आरोग्य संघटनेकडून दखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - पोलिओग्रस्त बालकाच्या मृत्यूने बीड जिल्ह्यातल्या कान्हापूरच्या गल्लीपासून आरोग्य खात्याच्या दिल्लीतील कार्यालयापर्यंत हादरे बसले आहेत. एवढेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेनेही बालकाच्या मृत्यूचा रिपोर्ट मागवला असून त्यांचे प्रतिनिधीही लातुरात येऊन गेले आहेत. दरम्यान, बालकाच्या शवविच्छेदनातून घेण्यात आलेल्या मेंदूच्या अंशावर येथील डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्या सुरू केल्या आहेत. लातूरच्या प्रयोगशाळेतील अहवाल सात दिवसांत येणार आहे. त्याच्या पुन:परीक्षणासाठी व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला पाठवण्यात येणार असून तेथील तज्ज्ञही त्याची खातरजमा करणार आहेत. दरम्यान, राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी लातूर येथील या घटनेसंदर्भात सोमवारी पुणे येथे आरोग्य उपसंचालकांची तातडीची बैठक घेतली.


बीड जिल्ह्यातील खानापूर येथील रोहित राजाराम शेळके (11) या मुलाचा पोलिओने मृत्यू झाल्यानंतर देशाच्या आरोग्य विभागाचीच झोप उडाली आहे. दिल्लीपासून लातूर-बीडपर्यंत बैठकांचे सत्र सुरू आहे. या आजाराने मृत्यू झाल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांशी विचारविनिमय करूनच त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे शवविच्छेदन करावे लागते. तज्ज्ञांनी रोहितच्या मेंदू व स्पायनल कॉर्डचे नमुने घेण्यास रुग्णालयाला कळवले व त्यामुळे शवविच्छेदनाला विलंब झाल्याचे अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी सांगितले. जगात 16 प्रकारचे पोलिओ व्हायरस आहेत. सर्वसाधारणपणे हात-पायांपर्यंत व्हायरस परिणाम करतो. रोहितच्या बाबतीत तो मेंदूपर्यंत गेला. ही दुर्मिळातली दुर्मिळ बाब आहे. हा व्हायरस नेमका कुठून आला, तो ज्ञात 16 पेक्षा निराळा आहे का, त्याच्या निर्मूलनासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणती लस द्यावी लागेल, हे प्रश्न आरोग्य विभागासमोर आहेत. त्याची उकल शवविच्छेदन अहवालातून होणार आहे. विशेष म्हणजे आंतराष्ट्रीय तज्ज्ञ यावर संशोधनही करतील. यातून एखादी नवी बाब उघडकीस येईल. ती धोकादायक असेल तर त्याचा इलाज करण्याचा मार्गही मिळेल, असेही डॉ. दीप्ती डोणगावकर म्हणाल्या.


लसीकरणाचे आदेश नाहीत
सर्वसाधारणपणे पोलिओ रुग्ण आढळल्यानंतर रुग्ण आढळलेल्या केंद्रापासून 500 किलोमीटर परिसरात पुनर्लसीकरण होते. 10 दिवसांपूर्वीच येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयाने या लसीकरणाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाला कळवले होते. परंतु पुढील आदेश येईपर्यंत लसीकरण करू नका, अशा सूचना त्यांनी येथील आरोग्य विभागाला दिल्या आहेत.


जा अन् सरकारला विचारा
पोलिओने मृत्यू झाला असताना पत्रकारांना खरी माहिती देण्याऐवजी ती दडवण्याचे काम आरोग्य विभागाकरवी सुरू आहे याचा अनुभव पुन्हा एकदा आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या येथील पोलिओ विभागाचे काम पाहणारे डॉ.सतीश सराफ यांना पोलिओ मृत्यू घटनेनंतरकोणती प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभाग करीत आहे, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी याचे उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, सरकारकडे जा अन् त्यांना विचारा, असे सांगितले.