लातूर - शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या, मात्र विधानसभेत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून काढून टाकलेल्या मंडळींनी पक्षांतर्गत कोंडीला कंटाळून बुधवारी अखेर भाजपत प्रवेश केला. काँग्रेसने परतीचे दोर कापल्यामुळे आणि दिवसागणिक तालुक्यात भाजप वरचढ होत असल्यामुळे जि.प. निवडणुकीच्या तोंडावर अॅड. संभाजी पाटील यांच्यासह एक मोठा गट भाजपत डेरेदाखल झाला आहे.
शिरूर अनंतपाळ हा तालुका निलंगा विधानसभा मतदारसंघात येतो. लिंगायतबहुल असलेल्या या परिसरात अॅड. संभाजी पाटील यांचा वरचष्मा आहे. कधी ते स्वत:, तर कधी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेत निवडून येत राहिले आहेत. त्या दोघांनी जि.प.चे उपाध्यक्षपदही भूषवले आहे. काँग्रेसचे जुने आणि ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले. गेल्या जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात देशमुखांविरुद्ध बंड करून चाकूरकर-निलंगेकर गटाने जि.प. ताब्यात घेतली होती. त्या वेळी अॅॅड. संभाजी पाटील उपाध्यक्ष झाले होते. मात्र, याच मातब्बर पुढाऱ्याला दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाबाहेर काढण्यात आले. त्यांनी त्या वेळचे काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील निलंगेकर यांच्याविरुद्ध काम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. देशमुख गटानेही पूर्वीचे बंड आठवून त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यास उत्सुकता दाखवली नाही.