आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलांची हत्या; स्कार्फने गळा आवळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नांदेड शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कासारखेडा शिवारात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह दोन वर्षांचा मुलगा एक महिन्याच्या मुलीचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री घडली असून मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कासारखेडा (जि. नांदेड) येथील जीवन नागोराव गायकवाड (३०) हा पत्नी सत्त्वशीला गायकवाड (२१) हिच्याशी, तू मला पसंत नाहीस म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. सोमवारी रात्री त्याने कासारखेडा ते कामठा मार्गावर याच कारणावरून पत्नीशी वाद घालून तिला मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्यावर चाकूने वार करून स्कार्फने गळा आवळून खून करून मृतदेह बाजूला असलेल्या गवतात फेकला. दोन वर्षांचा मुलगा शैलेश एक महिन्याच्या मुलीचाही गळा दाबून खून केला. याप्रकरणी सुनंदा यशवंतराव इंगोले (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भोकरचे अप्पर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, नांदेड ग्रामीण विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील, अर्धापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिक निरीक्षक डी. एल. दंतूलवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

निर्दयी पित्याच्या कृत्याने परिसरात हळहळ : आरोपी जीवन हा पत्नी सत्त्वशीला हिला, तू मला पसंत नाहीस, तुझे चालचलन चांगले नाही, म्हणून गेल्या काही महिन्यांपासून मानसिक छळ करत असे. याबरोबरच मारहाणही करत असे. सोमवारी रात्रीही याच कारणावरून त्याने पत्नीला तर संपवलेच, शिवाय दोन वर्षांचा शैलेश केवळ एक महिन्याच्या गोंडस मुलीचाही गळा घोटून तिला संपवले. या निर्घृण हत्याकांडामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपी पोलिस ठाण्यात
खूनकरून जीवन गायकवाड पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून घटनास्थळावर नेल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला. जीवनला अर्धापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...