आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकाने, क्लबवर महिलांचा हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- वर्षभरापासून लेखी तक्रारी देऊन पोलिस कारवाई करत नसल्यामुळे रेणापूर तालुक्यातील तळणी मोहगावच्या संतापलेल्या 60 ते 70 महिलांनी दारू दुकानात घुसून मंगळवारी प्रचंड तोडफोड केली. तेथील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त करत महिलांनी गांजाचे गाठोडेही ताब्यात घेतले. यामुळे पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांविरुद्ध महिलांनी 'रास्ता रोको' केला. अखेर पोलिसांनी कारवाईची तयारी दाखवली. जप्त केलेला मुद्देमाल पोलिस फेकून देतील या शंकेने महिलांनी पोलिस जीपच्या मागेपुढे वाहने लावत चाकूर ठाण्यापर्यंत मोर्चा नेला. द्राक्ष निर्यातीसाठी प्रसिद्ध मोहगावातील कुटुंबे गांजा, दारू, जुगार, मटका यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. चाकूर पोलिसांसह महिलांनी पोलिस अधीक्षकांना याबाबत निवेदने दिली होती. मात्र पोलिसांनी विक्रेत्यांना पाठीशी घातले. त्यामुळे मंगळवारी सकाळी 60 ते 70 महिलांनी थेट ग्रामपंचायत गाठली. अवैध धंदें बंद न झाल्यास ग्रामपंचायत उघडू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. सरपंचांनी आपला त्याच्याशी संबंध नसून, तुमचे तुम्ही पहा असे सांगितले. त्यामुळे संतप्त महिलांनी दारूची चार दुकाने, जुगाराच्या तीन क्लबकडे मोर्चा वळवला. दुकानातील दारूच्या बाटल्या, बॉक्स, गांजाचे गाठोडे, जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. गावातील मंदिराच्या ओट्यावर हा मुद्देमाल ठेवून महिलांनी पोलिसांना फोन केला. पोलिस आल्यानंतर कारवाई होईल अशी अपेक्षा असलेल्या महिलांना अनुभव मात्र वेगळाच आला.
देशी दारूचे दुकान लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेत असलेल्या तानाजी वल्लमपल्ले यांच्या वडिलांचे असल्यामुळे पोलिसांनी आंदोलक महिलांनाच धाकदपटशा दाखवला. गुन्हा दाखल केल्यास तुमच्यामागे कोर्टाचा ससेमिरा लागेल. ठाण्यात खेटे घालावे लागतील. आंदोलन मागे न घेतल्यास शांतता भंग केल्याचे गुन्हे तुमच्यावरच नोंदवावे लागतील, अशी भीती पोलिस दाखवत होते. तरीही महिला मागणीवर ठाम होत्या. रौद्रावतार धारण केलेल्या महिलांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. प्रकरण गंभीर असल्याची माहिती मिळताच रेणापूरचे तहसीलदार एम.एम. आनंदा गावात आले. त्यांच्या सूचनेवरून पोलिसांनी कारवाईची तयारी दाखवली. जप्त मुद्देमाल पोलिस रस्त्यात फेकून देतील या शंकेने महिला पोलिस जीपमध्ये बसल्या. तर काहींनी खासगी टेम्पोने ठाणे गाठले. पोलिस गाडीच्या पुढे आणि टेम्पो मागे असा मोर्चा चाकूर ठाण्यात गेला. कारवाई करणार नसाल तर आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे जाऊ, असे महिलांनी धमकावल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
पित्यास धरून आणले- अनसूया आरदवाड या महिलेने पिता शंकर शिंगडे यांना धरून ठाण्यात आणले. आपले वडील शंकर शिंगडे हे अवैध धंद्यात गुंतलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, अशी जाहीर मागणी अनसूया यांनी चाकूरच्या पोलिस ठाण्यात केली. त्यामुळे आधी कारवाईस नकार देणार्‍या पोलिसांपुढे माघार घेण्यावाचून पर्याय राहिला नाही.
ठरवले आणि करून दाखवले!- गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी मटकाकिंग बाबूराव चव्हाणला अटक करून ताकीद देऊन सोडले. या प्रकरणात मात्र पोलिसांना जमले नाही ते महिलांनी करून दाखवल्याने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे.
दारू दुकानदारांना पकडले- धडाकेबाज कामगिरीत महिलांनी दारू दुकानाचे मालक वसंत वल्लमपल्ले, नवनाथ कणसे, तुकाराम कणसे आणि शंकर शिंगडे यांना पकडून चाकूर येथील पोलिस ठाण्यात आणले.