आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दोन तासांत अपहृताची सुटका, खंडणीसाठी परळीत कंत्राटदाराचे केले होते अपहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ - गुत्तेदारीची कामे द्या किंवा 10 मुलांना कामावर घ्या, या मागणीसाठी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात काम करणार्‍या खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाचे अपहरण करण्यात आले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करताच दोन तासानंतर व्यवस्थापकास सोडून आरोपी पसार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
शहराजवळील दाऊदपूर शिवारात दोनशे पन्नास मेगाव्ॉट क्षमतेच्या आठव्या संचाच्या उभारणीचे काम सुरू आहे. दिल्ली येथील डीसीपीएल या कंपनीकडे काही कामे आहेत. या कामातून काही कामे द्या किंवा दहा मुलांना कामावर घ्यावे, या मागणीसाठी पाच युवकांनी कंपनीचे व्यवस्थापक नागेश्वर झेना (रा. अंगुल, ओडिशा) यांच्यासह पाच जणांना गंगाखेड रस्त्यावरील पांडे पेट्रोल पंपावर अडवले. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी बोलेरो जीपमधून (एमएच 44, 3101) जात होते. सर्वांसमक्ष 25 ते 30 वयोगटातील पाच युवकांनी नागेश्वर झेना यांना गाडीतून खाली उतरवले. स्वत:च्या ताब्यातील पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसवून अपहरण केले. याप्रकरणी कंपनीचे अभियंता अविनाश विश्वकर्मा यांनी ग्रामीण पोलिसांत अपहरण व खंडणीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला. यानंतर दोन तासांनी झेना यांना रस्त्यात सोडून देण्यात आले. यामुळे वीजनिर्मिती केंद्रातील गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.