आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियोजनाअभावी थर्मलची बत्ती गुल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ - नागापूर येथील वाण धरणातील पाण्यावर परळीकरांची तहान भागवून औष्णिक वीज निर्मिती केंद्र वर्षभर चालले असते आणि पाणी शिल्लक राहिले असते. परंतु ऊर्जा, पाटबंधारे आणि महसूल खात्याच्या अधिका-यांतील समन्वयाचा अभाव नडला. तालुक्यातील सर्व प्रकल्पात 36.512 दलघमी पाणी उपलब्ध आहे. आगामी चार महिन्यांत या पाण्याचा विनियोग कसा करावयाचा, याविषयी कोणतेच धोरण स्पष्ट नाही.

मराठवाड्यात या वर्षी भीषण दुष्काळ पडलेला आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु परळी, अंबाजोगाई तालुक्यात सरासरीच्या सत्तर टक्के पाऊस झाला. बालाघाट डोंगराच्या उताराला परळी तालुक्यात मध्यम तीन तर दहा लघु प्रकल्प आहेत. यावर्षी तालुक्यातील तीनही मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले होते. लघु प्रकल्पांमध्येही 80 टक्के पाणीसाठा होता. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात पाऊस झाला नसल्याचे कारण पुढे करून जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी आरक्षित केले. अनेक वर्षांपासून धरण परिसरातील शेतकरी या पाण्यावरच शेती करतात. यंदा धरणे भरलेली असतानाही शेतक-या ना रब्बी पीक घेता आले नाही.
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करणारे माजलगाव आाणि जायकवाडी धरण कोरडेच असल्याने वीज निर्मिती केंद्र बंद करावे लागले. परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणात पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा 16.379 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. 84 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वीज निर्मिती केंद्रातील तीन संच चालवण्यासाठी दरमहा एक दशलक्ष घनमीटर पाणी लागते. या पाण्यावरच जूनअखेर चार दशलक्ष घनमीटर पाण्यावर तीन संच चालू राहिले असते. वीज निर्मिती केंद्रातील अधिका-यांनी पाटबंधारे, महसूल विभागाकडे पाण्याची मागणी केली, परंतु मागणीबाबत कसलाही पाठपुरावा केला नाही. पाणी नेणार कसे ? याचे नियोजनही सांगितले नाही. नागापूर धरणापासून सात किलोमीटर अंतरावर माजलगाव धरण कालवा आहे. या कालव्याच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत नागापूर धरणाचा कालवा आहे. त्यामुळे पाणी वाया न जाता माजलगाव कालव्यामार्फत खडका बंधा-यात सोडता आले असते. नागापूर धरणातून पाणी दिले असते, तर वीज निर्मिती केंद्र बंदच पडले नसते. शिवाय पाटबंधारे विभागाला आर्थिक फायदाही झाला असता.

पूर्वी याच धरणातून सुरू होता पाणीपुरवठा
वाण धरण ते परळी थर्मल हे अंतर 10 किलोमीटर आहे. 1971 ते
80 पर्यंत नागापूर धरणातून परळी थर्मलसाठी पाणीपुरवठा करण्यात आला होता. संच क्रमांक 1 (30 मेगावॅट) व 2 (30 मेगावॅट) साठी हा पाणीपुरवठा करण्यात आला. 80 पर्यंत हे दोनच संच कार्यान्वित होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 5 संच सुरू झाले. त्यासाठी लागणारे पाणी गोदावरीवरील खडका बंधा-या तून घेण्यात आले. दरम्यान, संच क्रमांक 1 आणि 2 जुने झाल्यामुळे सन 2010 मध्ये बंद करण्यात आले.
मुद्गलचे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न
*सध्या उस्मानाबाद, बीड जिल्ह्याच्या पट्ट्यात कमी पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. मार्च ते मे या कालावधीत पिण्याच्या पाण्याची सोय महत्त्वाची आहे. परळीतील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला मुद्गल धरणातून पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिवानंद टाकसाळे, प्रभारी जिल्हाधिकारी.
*पाण्याबाबत आदेशच नाहीत
तालुक्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. आॅक्टोबरपासून जिल्हा प्रशासनाने पाणी आरक्षित केल्याने आम्हाला काहीच निर्णय घेता येत नाही. वीज निर्मिती केंद्र चार महिने चालवूनही पाणी शिल्लक राहिले असते. भविष्यात पाण्याचे काय करायचे, याबाबत काहीही आदेश नाहीत.
आर. बी. करपे, मुख्य अभियंता, माजलगाव कालवा.
निर्णय शासनाने घ्यावा
* वीज निर्मिती केंद्रातील तीन संच चालवण्यासाठी दरमहा एक दशलक्ष घनमीटर पाणी लागत असते. पाणी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे लेखी पत्र दिलेले आहे. शासनाने ठरवायचे असते कोठून आणि किती पाणी द्यावयाचे. पाण्याअभावीच तर वीज निर्मिती केंद्र बंद पडले आहे.
आर. बी. गोहणे, उपमुख्य अभियंता, थर्मल.
टप्प्याटप्याने झाले संच बंद...
संच क्षमता कधी बंद
3 210 13 फेब्रुवारी 13
4 210 6 नोव्हेंबर 12
5 210 14 फेब्रुवारी 13
6 250 6 नोव्हेंबर 12
7 250 14 फेब्रुवारी