आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Water Parli Thermal Electricity Unite Close Down

पाण्याअभावी यंदाही परळी औष्ण‍िक विज केंद्र बंद राहणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ - जायकवाडी आणि माजलगाव धरणातील साठ्यामुळे यंदा परळीतील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रावर बंद पडण्याची नामुष्की ओढवणार नाही. मात्र, खडका बंधा-यात जानेवारीपर्यंत पुरेल एवढाच साठा असल्यामुळे वीजनिर्मितीत अडथळे येण्याची दाट शक्यता आहे.
मागील वर्षी केवळ पाण्याअभावी थर्मल बंद पडले. त्यामुळे महाजनकोला कोट्यवधींचा तोटा तर झालाच, शिवाय त्याचे बाजारपेठेवरही विपरीत परिणाम झाले. यंदाही पाण्याअभावी वीजनिर्मितीत आठकाडी आली, तर तालुक्याचे अर्थचक्रच रुतणार आहे.
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 1130 मेगावॅटचे पाच संच आहेत. पाचही संच पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी 18 हजार टन कोळसा आणि एक लाख क्युबिक लिटर पाणी लागते. वीजनिर्मिती केंद्राने सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदीवर पाच दशलक्ष घनमीटर क्षमतेचा बंधारा (खडका) बांधून पाणी अडवले. या बंधा-यातील साठ्यावर वीजनिर्मिती केंद्र तीन महिने चालते. जुलै महिन्यात बंधारा भरल्यानंतर डिसेंबरपर्यंत थर्मल सुरू असते. मागील वर्षी मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. जायकवाडी आणि माजलगाव धरणांनी तळ गाठला, तर खडका बंधा-यातील पाणी संपल्याने फेब्रुवारीअखेर वीजनिर्मिती केंद्र बंद करावे लागले. 42 वर्षांत पहिल्यांदाच ही वेळ आली. याचा फटका महाजनकोबरोबरच परळीकरांना सोसावा लागला. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवरही याचा विपरीत परिणाम झाला. मुसळधार पावसामुळे जुलैत बंधारा भरल्याने सहा महिन्यांनंतर वीजनिर्मिती केंद्र सुरू झाले. यंदा या बंधा-यातील जलसाठ्यावर डिसेंबरअखेरपर्यंत वीजनिर्मिती होऊ शकते. तसा अहवालही सप्टेंबरमध्येच ऊर्जा विभागाला पाठवला आहे. ऊर्जा विभागाने जायकवाडी व माजलगाव धरणात पाणी असल्याने वीजनिर्मिती केंद्राला पुरेसा पाणीपुरवठा होईल, असे पत्र दिले. शिवाय सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदीवर बांधलेल्या मुद्गल बंधा-यातूनही पाणी पुरवण्यात येणार आहे. खडका बंधा-यातील साठा संपताच मुद्गल धरणातून पाणी सोडले जाईल. यानंतर माजलगाव, जायकवाडी धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी देण्यात येणार आहे. जायकवाडी, माजलगाव धरणे यंदा शंभर टक्के भरली नसल्याने वीजनिर्मिती केंद्र सुरू राहील की नाही, याविषयी शंका होती; परंतु ऊर्जामंत्री अजित पवार यांनी वीजनिर्मिती केंद्राला पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरमध्येच ऊर्जा विभागाने हा निर्णय परळी वीजनिर्मिती केंद्राला कळवला. त्यामुळे केंद्र बंद राहणार नाही, अशी माहिती महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी एम. के. खांडेकर यांनी दिली.
उद्योग-व्यवसायही ठप्प
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून मिळणा-या फ्लाय अ‍ॅशद्वारे बांधकामासाठी विटा बनवण्यात येतात. या व्यवसायात अनेक लहानसहान उद्योजक आणि मजूर गुंतले आहेत. केवळ परळी तालुकाच नव्हे, तर पूर्ण जिल्हा आणि लातूर, परभणी जिल्ह्यातूनही या विटांना मागणी आहे.
तांत्रिक बिघाडामुळे संच बंद
केंद्रातील 250 मेगावॅटचे संच (क्र. 6, 7) कोळसा वाहतूक करणारा बेल्ट तुटल्याने आठ दिवसांपासून बंद आहेत. ते सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 210 मेगावॅटचे संच (4, 5) सुरू आहेत. दोन्ही संचांतून 296 मेगावॅट वीजनिर्मिती होत असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
मजुरांवर उपासमारीचे संकट
वीजनिर्मिती केंद्रामध्ये अनेक हंगामी मजूर आहेत. शिवाय केंद्राला विविध वस्तू पुरवणा-या व्यावसायिकांकडील मजुरांनाही या केंद्रामुळेच पूर्णवेळ रोजगार मिळतो. केंद्राच्या परिसरातील हॉटेल, पान सेंटर आदी व्यवसायाच्या माध्यमातूनही अनेकांची उपजीविका चालते. केंद्र वर्षभर सुरळीत सुरू असले तरच या किरकोळ व्यावसायिकांना आणि मजुरांना रोजीरोटी मिळते.