कन्नड - अॅपेरिक्षाने जोरात धडक दिल्याने ३० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी अंबा शिवारात घडली. संगीता कपूरचंद राठोड असे मृत महिलेचे नाव आहे.
कन्नड शहरात असलेल्या शिवनगरचे रहिवासी कपूरचंद राठोड हे मुलगी व पत्नीसह हे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या अंबा या मूळगावी जात होते. यादरम्यान उपळा पितळखोरा रस्त्यावर असलेल्या अंबा शिवारात नातेवाईक भेटल्याने ते रस्त्याच्या कडेला बोलत उभे राहिले. या वेळी कपूरचंद राठोड यांची दोन वर्षांची मुलगी रस्त्याच्या दिशेने निघाली. तेव्हा तिला बाजूला घेण्यासाठी तिची आई संगीता राठोड (३०)गेल्या. या वेळी रस्त्यानेे विनाक्रमांक अॅपेरिक्षा भरधाव आली व तिने संगीताला जोरदार धडक दिली. या धडकेत संगीता यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. संगीताला कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरून अॅपेरिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.