आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Death Shortage Of Treatment Facility In Mantha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंठय़ात उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा - विहिरीत पडलेल्या महिलेला बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंठा ग्रामीण रुग्णालयात घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली, तर हलगर्जीपणा करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन पंडित यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात आला आहे.विजयमाला सोपान लहाने (35, रा. मुरूमखेडा, ता. मंठा, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. मंठा तालुक्यातील मुरूमखेडा येथील महिला विजयमाला सोपान लहाने (35) सकाळी 8 वाजता पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या. तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत.

दीड तासांनंतर त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन पंडित यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. याप्रकारानंतर संतप्त झालेल्या महिलेच्या नोतवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव व जिल्हा प्रशासकीय अधिकारी आर. एम. मोहिते यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. डॉक्टर हजर राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या. डॉ.गजानन पंडित यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप जाधव यांनी सांगितले.