आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवाची बाजी लावून महिलेने पतीसह मुलाला वाचवले, दरोडेखोराच्या टोळीशी धाडसाने लढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - पाच ते सहा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने पती व मुलाला घेरल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी ५५ वर्षीय काशीबाई धाडसाने पुढे सरसावल्या. दरोडेखोरांच्या तावडीतून या दोघांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना त्यांच्यावर चॉपर, चाकूने सपासप वार करण्यात आले. त्यामुळे काशीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. तोपर्यंत दरोडेखोरांनी दागिन्यांसह १९ हजारांचा ऐवज लंपास केला होता. इकडे हल्ल्यात काशीबाईचा मृत्यू झाला. मात्र, त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळेच कुटुंबीयांचे प्राण वाचू शकले.

तुळजापर-अक्कलकोट रस्त्यावर यमगरवाडी (ता.तुळजापूर) गावापासून एक किलोमीटर अतंरावर ही शेतवस्ती आहे. या ठिकाणी पांडुरंग सखाराम जोगदंड यांचे पत्र्याचे घर आहे. शनिवारी (दि.१३) रात्री ९.३० वाजता पांडुरंग जोगदंड (६२), त्यांची पत्नी काशीबाई व मुलगा सखाराम जेवण करत होते. या वेळी त्यांचा शेजारी यमाजी सरवदे पिकाला पाणी देण्यासाठी शेतात आला होता. तोही त्यांच्या वस्तीवर जेवणासाठी आला होता. त्याच वेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक जबर मारहाण करण्यास सुरुवात केल्यामुळे कुटुंबीयांची धांदल उडाली. त्यांनी आरडाओरडही केली, परंतु गावापासून वस्ती लांब असल्याने मदत मिळू शकली नाही. दरोडेखोरांनी पांडुरंग व सखाराम या पितापुत्रांना मारहाण होत असल्याचे पाहून काशीबाईंनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पुढे सरसावल्या. दरोडेखोरांशी प्रतिकार करत दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु नि:शस्त्र काशीबाईंचा निभाव लागू शकला नाही. दरोडेखोरांनी चाकू,चॉपर साहाय्याने त्यांच्या तोंडावर, पोटात सपासप वार केले. त्यामुळे काशीबाई जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग व सखाराम यांना गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी वस्तीवर धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी त्यांना सोलापूरला हलवले. या मारहाणीत जमाजी सरवदे यालाही दुखापत झाली असून तुळजापूरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. घटनास्थळी काठ्या पडल्याचे दिसून आले. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी काशीबाईंनी दाखवलेल्या धाडसाचेही तेवढेच कौतुक होत आहे.

दहशतीचे वातावरण
या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ चो-यांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. त्यात जबरी दरोडा टाकून दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने वस्तीपासून अक्कलकोट रोडपर्यंत माग काढला.

१९ हजारांचा ऐवज लंपास
या झटापटीत दरोडेखोरांनी काशीबाईंच्या अंगावरील सोन्यासह रोख सहा ते सात हजार रुपये असा एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी यमाजी सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन पथके रवाना
घटनास्थळी पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, बाळकृष्ण भांगे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरोडेखोरांच्या मागावर पोलिसांनी तीन पथके सोलापूर, अक्कलकोट भागात पाठवली आहेत. तसेच तपासासाठी पोलिसांचे सर्व विभाग शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांची मदत घेण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी मोहन विधाते यांनी सांगितले.

लवकरच दरोडेखोरांना पकडू
खून व दरोड्याच्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत असून, लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील.
मोहन विधाते, डीवायएसपी.