आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा, सासू, नणंदेस सक्तमजुरी, जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा- सुनेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, नवरा आणि नणंदेस पाच वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा उमरगा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. मुंगले यांनी सुनावली.
माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये, असे म्हणत सततच्या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून उमरगा येथील काळे प्लॉटमधील संगीता दत्तात्रय सारणे हिने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. याप्रकरणी पती दत्तात्रय अण्णाराव तोरणे, सासू शांताबाई तोरणे, नणंद पार्वती बीरू मडके यांना शिक्षा सुनावण्यात आली.
बसवण्णा केंचप्पा वाले (रा. चितली, ता. आळंद, जि. गुलबर्गा) यांची मुलगी संगीता हिचा विवाह २००० मध्ये अक्कलकोट तालुक्यातील तारुणगी येथील दत्तात्रय अण्णाराव तोरणे याच्याशी झाला हाेता. मृत संगीता, पती दत्तात्रय तोरणे, सासू शांताबाई तोरणे, नणंद पार्वती बीरू मडके हे उमरगा येथील काळे प्लॉटमध्ये एकत्र राहात होते. लग्नानंतर नवरा, सासू नणंद यांनी माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
संगीताच्या वडिलांनी उमरगा येथे येऊन समजावून सांगितले शेतातील पीक निघाल्यानंतर पैसे देतो, असे म्हणाले होते. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून २७ नोव्हेंबर २००८ रोजी संगीताने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान संगीताचा डिसेंबर २००८ रोजी मृत्यू झाला. यावेळी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला होता. मृत्यूनंतर संगीताचे वडील बसवण्णा वाले यांनी संबंधितांविरुद्ध फिर्याद दिल्याने उमरगा पोलिस ठाण्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एम. मोरे यांनी गुन्हा दाखल करून उमरगा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. संगीताचे वडील फिर्यादी बसवण्णा वाले, चुलता शंकर वाले हे दोघेही फितूर झाले. घटनास्थळाचे पंच गुलाब वरवटे, हेडकॉन्स्टेबल विठ्ठल भंडारी, डॉ. विनोद जाधव यांचेसमोर हेडकॉन्स्टेबल उत्तम निरडे यांनी संगीताचा मृत्यूपूर्व जबाब घेतला होता, तो महत्त्वपूर्ण ठरला. या जबाबाला ग्राह्य धरून आरोपी नवरा, सासू नणंदेस उमरगा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. मुंगले यांनी बुधवारी (दि. १२) पाच वर्षे सक्तमजुरी ५०० रुपये दंड तसेच दंड भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शासकीय अभियोक्ता शुभदा पोतदार यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.