आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजमध्ये महिला नायब तहसीलदारांना मारहाण, मिलिटरी व्हीलवर स्वाक्षरीसाठी गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - बीएसएफ जवानाने व्हीलवर स्वाक्षरी का करत नाहीत म्हणून सैनिकाने महिला नायब तहसीलदारास मारहाण केल्याची घटना केज येथील तहसील कार्यलयात मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी धुडगूस घालणाऱ्या केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवसभर लेखणी बंद आंदोलन करून जवानाच्या या कृत्याचा निषेध केला आहे.

तरनळी येथील रोहिदास नानासाहेब खामकर (२३) हा तरुण मागील दीड वर्षापासून राजस्थान राज्यातील कोठा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. पंधरा दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्याला लग्न झाल्याचा पुरावा म्हणून तहसील विभागाकडून मिलिटरी व्हीलवर नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीची गरज होती, परंतु नियमानुसार व्हील प्रमाणित करून घेताना नायब तहसीलदारांसमोर पती-पत्नी सोबत असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर विवाहाचे पुरावे, ओळखपत्र असणे गरजेचे आहे. मात्र, कोणतेही पुरावे नसताना केवळ व्हीलवर सही करण्याचा आग्रह त्याने येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्याकडे केला. त्यांनी मी नियमबाह्य काम करणार नाही, असे थेट सांगितले. संतापलेल्या खामकरने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास वाघ यांना मारहाण केली.

मारहाणीत वाघ यांच्या डोके व हातावर जखमा झाल्या. याप्रकरणी त्यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जवान रोहिदास खामकरविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रोहिदास खामकर याला अटक करण्यात आली आहे.

जवानाचा माफी मागण्यास नकार
रोहिदास खामकर याचे कुटुंब ऊसतोडणीचे काम करत असल्याची माहिती वाघ यांना कळाली. तक्रार दाखल झाल्यावर सैनिकाच्या नोकरीवर गदा येईल त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणात मध्यस्थी करून रोहिदासला वाघ यांची माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु जवानाने माफी मागण्यापेक्षा गुन्हा दाखल झालेला बरा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे शेवटी गुन्हा नोंद झाला.

तहसीलमध्ये आजही काम बंद आंदोलन
केज येेथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वाघ यांना मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ महसूल विभागाने मंगळवारी दिवसभर लेखणी बंद आंदोलन केले. दरम्यान, बुधवारीदेखील तहसील कार्यलयात महसूल विभागाचे सर्व कर्मचारी काम बंद ठेवून निषेध व्यक्त करणार आहेत, अशी माहिती येथील तलाठी एफ. एस. हांगे यांनी दिली.

स्वाक्षरीला नकार दिला
^ मिलिटरी व्हील प्रमाणित करून देण्यासाठी दोघे पती-पत्नी सोबत असणे गरजेचे असते. मात्र, जवानासोबत त्याची पत्नी उपस्थित नव्हती, तरीही स्वाक्षरी करावी अशी मागणी करण्यात आली. नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्याने जवानाने हुज्जत घालून मारहाण केली.’’ - आशा वाघ, नायब तहसीलदार, केज
बातम्या आणखी आहेत...