देवगाव रंगारी - देशी दारू दुकान व बिअर शॉपीला दिलेला परवाना रद्द करून दुकानाचे बांधकाम पाडावे असा ठराव ग्रामपंचायतीत महिलांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
सरपंच व ग्रामसेवक यांनी 28 जुलै 2013 रोजी खोटा ठराव घेऊन देशी दारू दुकान व बिअर शॉपीला ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्या आधारावर व्यावसायिकाने याठिकाणी बांधकामही केले व व्यवसाय सुरू केला. या दुकानांच्या विरोधात महिलांनी एकत्र येत ती दुकाने तत्काळ बंद करण्यात यावीत, तसेच या दुकानांना ग्रामपंचायतीने दिलेली अनुमती तत्काळ रद्द करावी, यासंदर्भात 1 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. या वेळी सरपंचासह 17 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत 16 सदस्यांनी हे प्रकरण उचलून धरले होते. मात्र, त्यावेळी केवळ थातूर मातूर कारवाई झाल्याने पुन्हा बुधवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी गटविकास अधिकारी के. एस. सानप, ए. एन. गायके उपस्थित होते. कामकाज ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले यांनी पाहिले.
सदरील ठराव रद्द करण्यासाठी सूचक कल्पना सोनवणे यांनी ठराव मांडला. यासाठी संपूर्ण महिलांनी हात उंचावून अनुमोदन दिले.या सभेला दोनशेपेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या.