आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू विक्रीविरोधात नारीशक्ती एकत्र, विक्रेत्यास अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - हिमायतनगर तालुक्यातील वाशी येथील रणरागिणींनी मंगळवारी अवैध दारू विक्रीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. जवळपास ३० महिला व २० पुरुषांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
हिमायतनगर येथील काही परवानाधारक दारू विक्रेते पोलिसांना हाताशी धरून ग्रामीण भागात सर्रास अवैध दारूची विक्री करतात. यामुळे अनेक गरिबांचे संसार उघडल्यावर आले. तरुणाई व्यसनाधीन होण्याच्या मार्गाला लागली. याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. सोमवारी काही व्यक्तींनी एका नागरिकाला बेदम मारहाण केली. त्या वेळी महिलाही तिथे उपस्थित होत्या. त्या व्यक्तीचे ते कृत्य पाहून महिलांनी मंगळवारी आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी ११ वाजताच महिला पोलिस ठाण्यात हजर झाल्या. अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत महिलांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी तक्रार नोंदवून घेत अवैध दारू विक्री करणाऱ्या रामराव मारुती ढोलेला ताब्यात घेतले. तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात आली.
...जर पोलिस असतील तर त्यांच्यावरही कारवाई
दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात पोलिस कर्मचारी गुंतले असल्यास त्यांची चौकशी करून कारवाईसाठी अहवाल पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल, असे अशोक गिरी यांनी सांगितले.

हिमायतनगर तालुक्यातील वाशी येथील महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात एल्गार पुकारत पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी महिलांची तक्रार घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. छाया: अनिल मादसवार