आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात पडल्याने महिलेचा मृत्यू, बदनापूर तालुक्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेलगाव - पाय घसरून तलावात पडल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन महिला जखमी झाल्या. या दोघींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. लता जयसिंग दुल्हत असे मृत महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने नद्या, नाले तसेच तलावांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रविवारी राजेवाडी येथील तीन महिला सकाळी ९ वाजेदरम्यान शेताकडे बाजरीची सोंगणी करण्यासाठी निघाल्या होत्या. तलावाच्या कडेने जात असताना यातील सर्वात पुढे असलेल्या लता दुल्हत यांचा पाय घसरल्याने पाच वर्षांच्या मुलासह त्या तलावात पडल्या. त्यांना मदत करण्यासाठी सांडाबाई गोपाल खोलवाल आणि धोंडाबाई देवचंद गुसिंगे यासुद्धा पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघीही बुडत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी लहान मुलासह तिन्ही महिलांना लगेच पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी या सर्वांना शेलगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचार मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे लता जयसिंग दुल्हत (२९) यांचा मृत्यू झाला, तर सांडाबाई गोपाल खोलवाल (४५) आणि धोंडाबाई देवचंद गुसिंगे (४२) यांच्यावर खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजताच सेलगाव येथील आरोग्य केंद्रासमोर राजेवाडी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. डॉक्टरने वेळीच रुग्णालयात येऊन उपचार केले असते, तर लता दुल्हत यांचे प्राण वाचले असते असे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.