आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर शहरात गर्भपाताच्या औषधांची नियमबाह्य विक्री..!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जिल्ह्यात ठोक औषध विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात गर्भपाताची औषधे विकण्यात आली आहेत. तथापि ती खरेदी केलेल्या दुकानदारांकडे त्या औषध विक्रीच्या पावत्या आढळल्या नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत उघड झाली आहे. याअंर्तगत 22 विक्रेत्यांना एफडीएने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. 12 आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नाही. तथापि तसा गर्भपात करण्यासाठी वापरात येणारी इंजेक्शन्सही विकली गेली. त्याच्याही पावत्या न दिल्याने ती कोणाला विकली याचा उलगडा करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
परळी व बीड येथील गर्भपात प्रकरणानंतर प्रशासनाने अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून विशेष लक्ष पुरवले आहे. रुग्णालये, सोनोग्राफी सेंटरसह औषधी दुकानांचीही तपासणी सुरू आहे. लातूर जिल्ह्यात सहायक आयुक्त टी. ए. थूल यांच्या आदेशान्वये गर्भपाताच्या औषध विक्रीची अन्न व औषध प्रशासनातर्फे झाडाझडती सुरू असून यात अनेक धक्कादायक बाबी हाती आल्या आहेत. लातूर, चाकूर, निलंगा, उदगीर व अहमदपूर शहरात 48 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. या दुकानांतून गर्भपाताची 18 प्रकारची औषधे विकण्यात आली आहेत. परंतु ती कोणाला विकली याची नोंद वा पावती दुकानदारांकडे नाही. 12 आठवड्यांनंतरच्या गर्भपातामुळे गर्भवतीच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे असा गर्भपात करता येत नाही, असे असतानाही अशा गर्भपातासाठी वापरण्यात येणाºया विक्रिडील नावाच्या 340 इंजेक्शन्सची विक्री झाली आहे. ही इंजेक्शन्स कुणाला विकण्यात आली, याची पावती दुकानदारांनी ठेवली नसल्याने याचा वापर कोणी कशासाठी केला याचा उलगडा होणे कठीण आहे.
...तर परवाना रद्द करू
गर्भपाताच्या औषध व इंजेक्शन विक्रीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळ्ल्या आहेत. तपासणीतील 48 पैकी 22 दुकानदारांनी औषधांची विक्री करताना नियम पाळले नाहीत. त्यांना आम्ही शो कॉज बजावली आहे. दोषी आढळलेल्यांचा परवाना रद्द अथवा निलंबित करण्याची कारवाई आम्ही करू.
बळीराम मरवाड, औषध निरीक्षक
अशी मिळाली वाट
एफडीएने जिल्ह्यातील ठोक औषध विक्रेत्यांकडून दोन महिन्यांतील गर्भपात औषध विक्रीची माहिती मिळवली. ही औषधी खरेदी केलेल्या दुकानांची यादी बनवून त्यांची तपासणी सुरू केली.