आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Of Marathwada Enrich Literature, Dr.Prabha Ganorkar Said

मराठवाड्यातील महिलांची समृद्ध साहित्यनिर्मिती,डॉ. प्रभा गणोरकर यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - मराठवाड्यातील महिलांनी समृद्ध साहित्यनिर्मिती केली असून संत जनाबाई व संत बायनाबाई यांच्यापासून आजतागायत ती सुरू आहे. पाचवे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन त्याचेच द्योतक असल्याचे मत डॉ. प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले.
माजलगाव येथे (कै.) वसंतदादा पाटील प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित पाचव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी डॉ. गणोरकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मावळत्या अध्यक्षा डॉ. मथू सावंत होत्या. संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. ललिता गादगे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गणोरकर म्हणाल्या, साहित्याची परंपरा मोठी असून जनाबाईपासून या साहित्याची सुरुवात झाली असली तरी मराठवाड्यातील साहित्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले. मुंबई-पुण्याच्या लेखकांच्या कामगिरीचा सतत उल्लेख केला जातो. परंतु आमच्या चांगल्या साहित्याची कोणतीच दखल घेतली जात नाही. वाङ्मय हवे आहे, प्रवाह निर्माण व्हायला हवा यासाठी संमेलन व्हायला हवे. गावपातळीपर्यंत संमेलने घेतली तर ग्रामीण भागात चैतन्य निर्माण होते. मराठवाड्यातील जनतेचे साहित्य वाचनाकडे लक्ष नसते.
पुस्तकावर कोणीच खर्च करत नाहीत. महिला साहित्यिकांचे साहित्य कोणीच वाचत नसल्याच्या तक्रारी आहेत. मराठवाड्यातील महिलांनी साहित्य लिहिण्यास उशिरा सुरुवात केली, असेही त्या म्हणाल्या. तत्पूर्वी डॉ. मथू सावंत यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्षा योगिता होके पाटील, मसापचे डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी आमदार राधाकृष्ण पाटील, मोहन सोळंके, डॉ. अशोक तिडके, अशोक होके पाटील उपस्थित होते. धनंजय जाडे व योगेश जाडे यांनी स्वागत गीत गायले. वैभवी टाकणखारच्या नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अर्चना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.