आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदन: दारूचे दुकान हटवल्यानंतरच आंदोलन थांबवण्याचा ठराव, 10 गावात महिलांचा एल्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दानापूर- भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील सरस्वती महिला ग्राम संघटनेच्या महिलांनी दानापूर येथे दारू दुकान हद्दपार करण्यासाठी जनआंदोलन उभे केले आहे. या माध्यमातून परिसरातील दहा गावांतील महिलांमध्ये जनजागृती करून मेळावा घेण्यात आला आहे. रविवारी दानापूर येथे हा मेळावा घेण्यात आला. या वेळी एक हजार महिलांनी याला हजेरी लावली. 

दानापूर येथे परवानाधारक देशी दारूचे दुकान असून गेल्या पंधरादिवसापासून सुरूच आहे. या संदर्भात महिलांनी ग्रामसभेत ठराव घेत इतरत्र हालवण्याची मागणी केली होती. ठराव घेतला शिवाय निवेदनही दिले मात्र, असे झाल्यानंतरही देशी दारूचे दुकान सुरूच असल्याने तेथील सरस्वती महिला ग्रामसंघटना महिला बचत गटाने पुढाकार घेत पाठपुरावा केली आहे. या माध्यमातून परिसरातील महिलांमध्ये जनजागृती करून दहा गावांतील महिलांना दारू विक्री बंदीसाठी एकत्र आणले आहे. या अंतर्गत जागृत झालेल्या महिलांचा रविवारी दानापूर येथे मेळावा घेण्यात आला. 

यावेळी देशी दारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव महिलांनी या मेळाव्यात घेतला. या मेळाव्यात परिसरातील तळणी, भायडी, मुर्तड, सुरंगळी, देहेड, वालसा, वडशेद नवे, वडशेद जुने, गोद्री, निंबोळा, दगडवाडी आदी गावांतील महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व्यापारी संघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सिताबाई मोहीते, प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद सदस्या आशा पांडे, रामभाऊ मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

रविवारी सकाळी १० वाजता मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी गावात रॅलीचे आयोजन केले. यावेळी रॅलीत महिलांबरोबर युवतींनीही सहभाग नोंदवला. यावेळी दारु बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये जवळपास एक हजार महिलांनी सहभाग नोंदवला. सिताबाई मोहिते, जि. प. सदस्या आशा पांडे, ग्रामसेवक एस.आर.पडोळ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी दानापुरच्या सरपंच दुर्गाबाई दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष युसूफभाई, अब्बास, बालाजी पवार, जावेद चौधरी, अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती.

दानापूर बचत गटाच्या महिलांनी जी चळवळ हाती घेतली आहे. याचा आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे. दारूबंदी संदर्भात सर्व महिला एकत्र करून या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. प्रसंगी उपोषणही करू असे महिला व्यापारी संघटनेच्या सिताबाई मोहिते यांनी सांगितले. 
 
जन आंदोलन सुरूच 
दानापूरयेथेआयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मेळाव्याला परिसरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या माध्यमातून हाती घेण्यात आलेले जनआंदोलन सुरूच राहणार आहे. यासाठी इतर गावच्या महिलांनीही सहभाग नोंदवावा. 
- सुनीता मोकासे, बचत गट प्रेरिका, दानापूर 
 
पुढील स्लाइडवर पाहा आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...