आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरी येथील महिलेला राजस्थानातील विवाहित पुरुषाला विकल्याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- उमरी येथील महिलेला राजस्थानातील एका विवाहित पुरुषाला विक्री करून नेत असल्याच्या संशयाने शिवाजीनगर पोलिसांनी पीडित महिलेला वसमत रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले. चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

उमरी येथील २३ वर्षीय विवाहित महिला असून तिला तीन अपत्येही आहेत. ती महिला पतीपासून वेगळी राहते. तिला तिच्या निकटच्या नातेवाइकांनी राजस्थानातील एका पुरुषाला लग्न लावण्याच्या उद्देशाने विक्री केल्याचा संशय आहे. नांदेड शहरातील एका दलालाने या सर्व विक्री प्रकरणात मध्यस्थी केली. शहरात तिचे लग्न लावून हे सर्वजण रविवारी राजस्थानकडे निघाले. रात्री वसमत स्थानकावर झोपले असताना दलालासोबत असलेल्या एका तरुणाने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही बाब रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्याच्या लक्षात आली. त्याने त्याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीला आला. वसमत पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस सोमवारी तातडीने वसमतला गेले व त्यांनी पीडित मुलीसह १ महिला व ४ आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान, २०११ मध्ये शहरातीलच एका मुलीला हरियाणात विकण्यात आले. पोलिसांनी कारवाई केली; पण अखेर मुलीनेच हरियाणात जाणे पसंत केले. सहा महिन्यांपूर्वीच नांदेड स्थानकावर सोलापूरच्या एका महिलेलाही अशाच पद्धतीने नेण्यात येत होते. रेल्वे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून ते प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग केले.

ह्युमन ट्रॅफिकिंगचा गुन्हा
राजस्थानातील ज्या पुरुषाने या महिलेशी लग्न केले, तो विवाहित आहे. कायद्यानुसार, त्याला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरे लग्न करता येत नाही. अशा परिस्थितीत त्याने उमरी येथील विवाहित असलेल्या दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले. यात शहरातील एका दलालाने व्यवहार केला. हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा गुन्हा आहे. महिलेने नेमका काय जबाब दिला याची मला कल्पना नाही.
- परमजितसिंह दहिया, पोलिस अधीक्षक, नांदेड