आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Torture In Women Empowerment Centre In Latur

लातूर मध्‍ये महिला सबलीकरण केंद्रातच महिलांचा छळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - केवळ महिलांसाठी असलेल्या सबलीकरण केंद्रात बाहेरील पुरुष ‘मुक्काम’ करीत आहेत. त्याला आक्षेप घेतल्यामुळे संस्थेचे संचालक आणि सहकारी कर्मचारी छळ करीत असल्याचे नमूद करीत तेथे काम करीत असलेल्या एका महिला कार्यकर्तीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
बुधवारी या महिलेने लातूरपासून जवळच असलेल्या पेठ शिवारातील माजी आमदार किशनराव जाधव यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्वर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार या कोकाटेनगर भागात पुणे येथील वंचित विकास महिला सबलीकरण केंद्राची शाखा आहे. तेथे संगीता व्यंकट व्हंताळे (34) ही घटस्फोटित महिला गेल्या 13 वर्षांपासून कायकर्ती म्हणून नोकरी करीत होती. तिने बुधवारी सकाळी पेठ शिवारातील माजी आमदार किशनराव जाधव यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी विहिरीच्या भोवतालचा परिसर पिंजून काढल्यानंतर महिलेची बॅग आढळून आली. त्यामध्ये एक चिठ्ठी सापडली असून वंचित विकास संस्थेचे संचालक विलास चाफेकर (रा. पुणे) यांच्यासह संस्थेतील कर्मचारी शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते. त्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर केवळ महिलांसाठी असलेल्या या केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी बाहेरील पुरुष यायचे. तसेच रात्री मुक्काम करायचे. संस्थेतील मुलींचा छळ करायचे असेही चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांची नावेही चिठ्ठीत लिहिण्यात आलेली आहेत. याआधारे मृत मुलीचे वडील व्यंकट व्हंताळे (65, रा. नागरसोगा, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लातूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विलास चाफेकर, सुंदर साबळे, रंजना चव्हाण, संगीता साळुंके यांना अटक केली असून त्यांना 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

महिला बालकल्याण विभाग अनभिज्ञ
या प्रकरणाबाबत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी हर्षा देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कार्यालयात आणि मोबाइलवर उपलब्ध झाल्या नाहीत. उपस्थित कर्मचा-यांनी आम्हाला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. हर्षा देशमुख यांचा मोबाइल घरीच विसरला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

सुसाइड नोट गायब
पोलिसांनी ज्या सुसाइड नोटच्या आधारे तपास केला आहे. ती नोट मात्र गायब झाली आहे. तपासी अधिका-यांना विचारणा केली असता ती वरिष्ठांकडे दिल्याचे सांगण्यात आले. याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे विचारणा केली असता ती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी विलास चाफेकर हे बडे प्रस्थ आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे.

पोलिसांचा पक्षपातीपणा
मृत संगीता व्हंताळे हिने चिठ्ठीमध्ये सबलीकरण केंद्रात परपुरुष येऊन संस्थेतील महिलांची छेड काढीत असल्याचे आणि रात्री मुक्काम करीत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यातील दोघांची नावेही तिने चिठ्ठीत लिहिली आहेत. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.