आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Womens Doctor Gifted Each Other Tree Plant On Sankranti Occasion

डॉक्टरांनी वाण म्हणून वाटली १६० रोपटी, सणोत्सवाला मिळाली पर्यावरण संवर्धनाची जोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - सणोत्सवाच्या व्यासपीठाला पर्यावरण संवर्धनाची जोड दिल्यास त्यातून होणारे वृक्षसंवर्धन अन् त्यायोगे मिळणारे समाधानही सर्वांना सुखावून जाते. याचाच प्रत्यय लातूरच्या स्त्री रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. माधुरी अभय कदम यांच्या पर्यावरणपूरक वाणाने पुन्हा एकदा दिला आहे. मकरसंक्रांतीच्या औचित्याने घेण्यात येत असलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात त्या रोपट्यांचे वाण देत असून या वर्षीही त्यांनी वाण म्हणून १६० रोपटी सुवासिनींच्या हाती दिली.
डॉ. माधुरी यांचे गोळ्या-औषधी अन् सुई - स्टेथोस्कोपशी व्यावसायिक नाते असले, तरी हिरवळीशीही त्यांची पाळेमुळे जुळली व जडल्याची साक्ष त्यांच्या घराशेजारी त्यांनी फुलवलेली बाग अन् वाढवलेली फुलझाडे देतात. व्यग्र दिनक्रमातही त्या पेशंटप्रमाणेच झाड-वेलींची काळजी घेतात. प्रत्येकाने आपल्या दारी एक - दोन झाडे लावून जगवली, तर पर्यावरणाची होणारी परवड काहीअंशी तरी थोपवता येईल. पाखरांना हक्काचा निवारा मिळेल, त्याचे गुंजन मनाला सुखावेल, असे त्या सांगतात. दोन वर्षांपासून संक्रातीला अशा पर्यावरणपूरक वाणांची भेट देत असून ते वाढवण्याची विनंतीही त्या आपल्या मैत्रिणींना करत आहेत.

रांगोळीतूनही संदेश
डॉ. कदम यांनी सुवासिनींचे स्वागत करण्यासाठी रांगोळीतूनही पर्यावरणाचा संदेश दिला. ‘एक्स्पेक्टिंग ग्रीन अर्थ’ अर्थात ‘हरित वसुंधरेची कामना’ ही माफक अपेक्षा त्या रांगोळीतून बोलकी झाली होती.

काहीसा हातभार
-संस्कृती, परंपरा अन् सणांची व्यासपीठे या विधायक कामासाठी वापरली, तर त्यातून पर्यावरण संवर्धनाला काहीसा तरी हातभार लागेल. याच भावनेतून हे काम केले.
-डॉ. माधुरी कदम