तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरामध्ये रविवारी रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. रथात स्वार झाल्यानंतरचे देवीचे रूप लाखो भक्तांनी डोळ्यात साठवले. सकाळी येथे नियमितपणे करण्यात येणारा अभिषेक करण्यात आला. दुपारी ११ वाजता तुळजाभवानी देवीला महावस्त्र, अलंकार घालण्यात आले. त्यानंतर देवीची रथ अलंकार पूजा मांडण्यात आली. या वेळी देवीला रथात स्वार करण्यात आले.
रथासमोर जुंपलेले घोडे, हातात लगाम व चाबूक असा रथ देवी चालवत असलेला हुबेहूब देखावा मांडण्यात आला. रथात स्वार असलेले देवीचे हे चैतन्यदायी रूप सायंकाळी सात वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. नवरात्र महोत्सवामध्ये येणा-या ललिता पंचमीला अशी पूजा मांडण्यात येत असते. त्यानुसार रविवारी ही पूजा मांडण्यात आली. रथात स्वार झालेले देवीचे रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी तीन लाख भाविक तुळजापूरनगरीत शनिवारपासून दाखल झाले होते.