आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचक, लेखक वाढण्यासाठी गावपातळीवर संमेलने व्हावीत : भांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच बाल साहित्यिक आणि प्रकाशक बाबा भांड यांची निवड झाली. त्यानिमित्त त्यांच्याशी मराठी लेखन, संमेलने व साहित्यविषयक विविध मुद्द्यांवर साधलेला संवाद...
निवडणुकीतून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया योग्य वाटते का? यावर बाबा भांड म्हणाले की, अध्यक्ष निवडीला अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्यास काही हरकत नाही, ही लोकशाही आहे. या प्रक्रियेला माझे समर्थन आहे. मराठवाडा-विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्‍ट्रात अधिक साहित्य संमेलने होतात. आपल्याकडे संख्या कमीच असते, यावर त्यांनी अधिक व कमी संमेलने हा साहित्याचा निकष नाही. किती सशक्त प्रकारचे लेखन करतोय ते महत्त्वाचे. आज पुण्या-मुंबईच्या बाहेर जी लिहिणारी मोठी पिढी आहे. ती मराठी असून मराठवाड्यातीलच आहे. साहित्यक्षेत्रात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशी विभागणी नको. संमेलने कमी असतील; परंतु साहित्याची उत्तम निर्मिती मराठवाडा, विदर्भात मोठ्या प्रमाणात होत आहे.
प्रकाशनाची साधने 35 वर्षांपूर्वी कमी होती. आपल्याकडे प्रकाशनाचे केंद्र मुंबई, पुणेच होते. आता हे केंद्र विस्तारले आहे. परभणी, लातूर, औरंगाबाद, नांदेडला केंद्र आहेत. लिहिणारे वाढले तसे प्रकाशनही वाढले.
संमेलने छोट्या-मोठ्या संस्थांनी केली पाहिजेत; पण आज दुर्दैवाने काय झाले की, मोठे संमेलन म्हटले की मोठी संस्था, पुढारी, त्यासाठी मॅनेजमेंट पॉवर असणारी माणसेही आम्हाला लागतात; परंतु त्यांच्यापेक्षा गावागावांत छोटी संमेलने होणे गरजचे आहे. अशा संमेलनाला लेखकांनी निमंत्रणाची वाट न पाहता सन्मानाने जावे. जसे आपण पंढरपूर यात्रेसाठी न बोलावता जातो. तसेच गेले पाहिजे. मानधन व मानसन्मानाची गरज नाही. आपण आपल्या श्रद्धास्थानी स्वखर्चाने जात आहोत, असा भाव साहित्यिकात असला पाहिजे. आम्हीच वाचकांकडे गेले पाहिजे. संगमनेर येथील एका छोट्या शाळेच्या विद्यार्थ्याने मला माझ्या ‘धर्मा’ नावाच्या कादंबरीबद्दल 50 पत्रे पाठवली होती. आम्हाला तुमच्याकडे भेटण्यासाठी येणे शक्य नाही, असे म्हटल्यानंतर मी त्या मुलाला शाळेत जाऊन भेटलो. जर ही भावना ठेवली, तर संमेलनाला अधिक माणसं जातील.
मातृभाषेशिवाय आपले आकलन वाढणार नाही. जगात कोणत्याही राष्ट्रात मातृभाषेचा आग्रह धरतात. मुलांना इंग्रजी आली पाहिजे. मी त्याच्या विरोधात नाही; पण ती जगाची भाषा आहे. इंग्रजीच्या मागे आज शहरापासून ते खेड्यातील लोक लागले आहेत. ते फारसे चांगले नाही. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुन्हा आपण मातृभाषेकडे वळल्याशिवाय राहणार नाही.
आज प्रकाशकांना वाचकांची अभिरुची पाहूनच पुस्तके छापावी लागणार आहेत. 35 वर्षांपूर्वी माझा कथा-कादंबरीवर जोर होता; पण आज माझा मुलगा, सून वाचकांचा कल पाहून पुस्तके छापतात.