आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येडेश्वरी चरणी १० लाख भाविक, जयघोषाने आसमंत दुमदुमला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब/येरमाळा - आईराजा उदो उदोचा गजर.., संबळाचा कडकडाट..,आराधी गीतांच्या तालावर डोंगरमाथ्यावरील येडेश्वरीच्या पालखी मिरवणुकीस रविवारी (दि.५) सकाळी ८.३० वाजता सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता आमराई मंदिरात पालखी विसावली. तत्पूर्वी सुमारे दहा लाख भाविकांनी चुनखडी वेचण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे येरमाळानगरी भक्तिसागरात न्हाऊन निघाली.

श्री क्षेत्र येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेतील चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी पार पडला. चुनखडी वेचण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी सुमारे दहा लाख भाविक येरमाळानगरीत दाखल झाले होते. रविवारी सकाळी ८.३० वाजता येडेश्वरी देवीच्या पालखीचे मुख्य डोंगरावरील मंदिरातून झांज, ढोलकी, संबळाच्या गजरात आमराई मंदिराकडे प्रस्थान झाले.

भाविकांची अलोट गर्दी लोटल्याने पोलिस बंदोबस्तात संथगतीने पालखीचा प्रवास सुरू ठेवण्यात आला. सकाळी ९.३० वाजता पालखीने गावात प्रवेश केला. गावातील मुख्य रस्त्यावरून पालखी जात असताना खांदेकर्‍यांच्या पायावर पाणी घालून परशुरामाच्या मूर्तीला चुरमुरे, बत्ताशे पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पालखीचा वेग मंदावला होता.

सकाळी ११ वाजता चुनखडीच्या राशीवर येडेश्वरी देवीच्या पालखीचे आगमन झाले. या वेळी चुन्याचे वेचलेले पाच खडे नैवेद्य पालखीवर टाकण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. चुनखडीच्या रानातून पालखी आमराई मंदिरात दुपारी १२ वाजता विसावली. या वेळी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार राणाजगजितसिंह पाटील, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आदींनी देवीच्या पालखीचे दर्शन घेतले. या वेळी प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, कळंबच्या तहसीलदार वैशाली पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे, डी. जी. चिखलीकर आदी अधिकारी उपस्थित होते.

उन्हातही भाविक भक्तीत दंग
सलगदोन आठवड्यांत उन्हाची तीव्रता वाढतच आहे. रविवारी देखील तीव्र उन्हाचे चटके बसत होते. सकाळपासूनच ऊन पडलेले असताना याची तमा बाळगता श्री येडेश्वरी देवीच्या भक्तीत भाविक दंग झाले होते.

विमानातून पुष्पवृष्टी
श्रीयेडेश्वरी देवीची पालखी चुन्याच्या रानात आल्यानंतर विमानातून पाच वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामुळे हा क्षण पाहणार्‍या भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच या पुष्पवृष्टीमुळे भाविक प्रभावित झाल्याचे दिसून येते.

श्री क्षेत्र येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेतील चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी पार पडला. चुनखडी वेचण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी सुमारे दहा लाख भाविक येरमाळानगरीत दाखल झाले होते. पालखीवर विमानातून पाच वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली.